बेळगाव : ज्येष्ठ पत्रकार अशोक याळगी यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. एक निर्भिड पत्रकार आणि सडेतोड लेखन करून त्यांनी पत्रकारितेत आपला वेगळा ठसा उमटवला होता. सर्च लाईट,काटेरी मखमल हे तरुण भारत मध्ये प्रसिध्द होणारे त्यांचे सदर गाजले होते. अनेक विषयांना त्यांनी आपल्या सदरातून वाचा फोडली होती. सीमा आंदोलनात देखील त्यांचा मोठा सहभाग होता.


विविध क्षेत्रातील मंडळींशी त्यांचा घनिष्ट परिचय होता. सीमाभागातील अनेक साहित्य संमेलनाचे ते मार्गदर्शक आणि आधारस्तंभ होते. बेळगावच्या साहित्यिक क्षेत्रात ते नेहमी उत्साहाने आपला सहभाग नोंदवत असत. वांगमय चर्चा मंडळ आणि लोकमान्य ग्रंथालयाच्या माध्यमातून ते सदैव कार्यरत होते. लोकमान्य वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढीस लागावी म्हणून विविध उपक्रम त्यांनी राबवले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. दुपारी बारा वाजता त्यांच्यावर सदाशिव नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


सीमाभागातील साहित्य संमेलने सुरू करण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. चौफेर वाचनामुळे अनेक विषयांचे संदर्भ त्यांच्याकडे उपलब्ध असायचे. मराठी भाषेच्या शुध्दलेखनाविषयी ते नेहमी आग्रही असायचे. अनेक तरुण पत्रकारांना त्यांचे करिअर घडवण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीशी त्यांचा स्नेह लगेच जुळायचा. त्यामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. रणजित देसाई, मधू मंगेश कर्णिक, म. द. हातकणंगलेकर आणि अनेक साहित्यिकांशी त्यांचे घनिष्ट संबंध होते. बेळगावच्या साहित्यिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे.