नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधला आहे. 2019मध्ये भाजप जिंकल्यास भारत 'हिंदू पाकिस्तान' बनेल असा दावा शशी थरूर यांनी केला आहे. तर शशी थरुर यांच्या वक्तव्यांवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली.

काय म्हणाले शशी थरुर?
शशी थरुर तिरुवनंतपुरम येथील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, भाजपाने 2019च्या लोकसभा निवडणुका जिंकल्या, तर ते संविधानाची मोडतोड करतील. त्यामुळे भारत 'हिंदू पाकिस्तान' बनेल, म्हणजे सध्या पाकिस्तानची जी अवस्था आहे, तशी भारताची अवस्था होईल. याशिवाय भाजपची पुन्हा सत्ता आली तर लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण होईल.

संविधानातील सर्व मूलभूत तत्वे काढून टाकण्यात येतील. तसेच नव्या संविधान निर्मितीचे काम सुरु होईल. त्यामुळे तयार झालेले नवे राष्ट्र हे हिंदू राष्ट्राच्या सिद्धांतांवरच चालेल आणि भारत हिंदू पाकिस्तान बनेल, असा दावा शशी थरूर यांनी केला.

भाजपचा पलटवार

शशी थरुर यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत भाजप नेत्यांनी म्हटलं की, पाकिस्तानच्या निर्मितीला केवळ काँग्रेसच जबाबदार आहे. तसेच भारताची पाकिस्तानशी तुलना केल्यानं राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपनं केली आहे.

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विटरवर म्हटलं की, 'शशी थरुर यांच्या मते भाजप 2019ला सत्तेत आली तर भारत हिंदू पाकिस्तान बनेल. बेशरम काँग्रेस, भारताला कमीपणा दाखवण्यासाठी आणि हिंदू नागरिकांना बदनाम करण्याची एकही संधी काँग्रेस सोडत नाही. 'हिंदू दहशतवादा'पासून 'हिंदू पाकिस्तान'पर्यंत... काँग्रेसच्या पाकिस्तानला खुश करण्याच्या कृतींना तोड नाही.'