Sanjay Raut on President : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपती पदाबाबत वक्तव्य करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा अनुभव राष्ट्रपती पदासाठी योग्य आहे, असं म्हटलं आहे. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी म्हटलं की, 'देशाला राष्ट्रपती हवे असतील तर शरद पवार आहेत, रबर स्टॅम्प तर अनेक रांगेत आहेत. राष्ट्रपती पद कुणाला द्यायचं राज्यकर्त्यांवर आहे. देशाला एक आदर्श राष्ट्रपती हवा असेल, उत्तम प्रशासक हवा असेल तर सरकारनं राष्ट्रपती निवडावा, रबर स्ट्रम्प निवडू नये.'
'शरद पवार देशातील प्रमुख नेते आहेत. सगळ्यात अनुभवी नेते आहेत. संसदीय लोकशाहीमध्ये गेली 50 वर्ष अजिंक्य असलेले नेते आहेत. राज्यकर्त्यांचं मन मोठं असेल तर ते राष्ट्रपती निवडतील, नाहीतर खुजे लोक निवडतील. पण अर्थात शरद पवार यांनी या सर्वाला मान्यता दिली तर या गोष्टी शक्य आहेत.', असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत सध्या अयोध्येत आहेत. र्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या आगामी अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राऊत अयोध्येत तयारीची पाहणी करत आहेत.
दरम्यान मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या सरकारी मेगा भरतीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मेगा भरतीच्या निर्णयाचे स्वागत करतो असं राऊत यांनी म्हटलं आहे. 'पंतप्रधान मोदी यांनी निवडून आल्यावर दोन कोटी रोजगार देण्याची हमी दिली होती. त्यानंतर भाजपनं पाच कोटी रोजगार देण्याचा दावा केला, मात्र पूर्ण केला नाही. आता मोदी यांनी दिलेलं वचन पाळण्याची गरज आहे', असं राऊत म्हणाले.
राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान
पुढील महिन्यात 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान पार पडणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या