Coronavirus Cases Today : देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या धोक्यात दिलासादायक बातमी समाेर आली आहे. देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 6594 नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट दिसून आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सोमवारी दिवसभरात 6594 रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासांत 4035 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले आहेत.
देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 50 हजार 548 पर्यंत पोहोचली आहे. मंगळवारी दैनंदिन सकारात्मकता दर मागील दिवसाच्या तुलनेत 2.05 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गेल्या चार महिन्यांपासून हा दर तीन टक्क्यांहून अधिक होता. गेल्या 24 तासांत 4,035 रुग्ण विषाणूपासून बरे झाले असून, महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4 कोटी 26 लाख 61 हजार 370 इतकी आहे.
गेल्या 24 तासांत तीन लाखांहून अधिक कोविड चाचण्या
देशात मागील 24 तासांत एकूण 3 लाख 21 हजार 873 कोविड 19 चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारताने आतापर्यंत एकुण 85.54 कोटींहून अधिक कोरोना चाचण्या केल्या आहेत. देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे एकुण 195.35 कोटींहून अधिक डोस देण्यात आलं आहेत.
भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येने डिसेंबर 2020 मध्ये एक कोटींचा टप्पा ओलांडला होता. गेल्या वर्षी मे महिन्यात दोन कोटींचा टप्पा आणि जून 2021 मध्ये तीन कोटींचा टप्पा ओलांडला होता.
महाराष्ट्रात 10 दिवसांत रुग्ण संख्या पाच हजारांवरून 17 हजारांवर
महाराष्ट्रातील सक्रिय कोविड रुग्णांमध्ये 10 दिवसांच्या कालावधीत मोठी वाढ झाली आहे. 3 जून रोजी सक्रिय रुग्णांची 5,127 वरून 17,480 वर पोहोचली आहे. रुग्णसंख्येत 241 टक्क्यांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.86 टक्के आहे.