Government Recruitment : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सरकारी नोकरी संदर्भात मोठी घोषणा केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. सरकारकडून बंपर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये 10 लाख पदांवर भरती करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या सरकारी विभागांमध्ये अनेक सरकारी पदं रिक्त आहेत. त्यामुळे मोदी सरकार आता मिशन मोडमध्ये आलं असून पुढील दीड वर्षामध्ये सरकार नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करुन देणार आहे.


पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात ट्विट करत ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भरतीअंतर्गत आधी 40 हजार पदांवर भरती करण्यात येईल. सरकारी आकडेवारीनुसार, सैन्य दलात मागील दोन वर्षांपासून भरती झालेली नाही. रेल्वेमध्ये विविध विभागात सुमारे तील लाखांहून अधिक पदं रिक्त आहेत. रेल्वेमध्ये 15 लाख 7 हजार 694 पद भरण्यास मंजूर असून सध्या 12 लाख 70 हजार 399 पदांवर भरती करण्यात आली आहे. पोस्ट ऑफिसमध्ये 90 हजार पदं रिक्त आहेत. महसूल विभागात सुमारे 75 हजार पदे रिक्त आहेत. संरक्षण विभागात सुमारे अडीच लाख पदे रिक्त आहेत. तर गृहमंत्रालयात सुमारे एक लाख 30 हजार पदं रिक्त आहेत.






देशात बेरोजगारीची समस्या सातत्याने वाढताना दिसत आहे. एप्रिलमध्ये देशातील बेरोजगारीचा दर 7.83 टक्क्यांवर पोहोचला आहे. यापूर्वी मार्चमध्ये हा दर 7.60 टक्के होता. CMIE (Centre for Monitoring Indian Economy) संस्थेच्या आकडेवारीनुसार, मार्च 2022 मध्ये शहरी बेरोजगारीचा दर 9.22 टक्के होता आणि ग्रामीण भागात हा दर 7.18 टक्के होता. मे 2021 मध्ये बेरोजगारीचा दर 11.84 टक्क्यांवर पोहोचला. त्यानंतर जानेवारी 2022 मध्ये हा दर 6.57 वर पोहोचला आहे.