Sanjay Raut Meet Rahul Gandhi : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल (मंगळवारी) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली आहे. त्यानंतर आज ते प्रियांका गांधींची भेट घेणार आहेत. प्रियांका गांधी सध्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष लक्ष देत आहेत. अशातच गोवा आणि उत्तर प्रदेश निवडणुकीत उतरण्यावर शिवसेना आग्रही असताना, ही भेट महत्वाची ठरणार आहे. या भेटीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. 


बैठकीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, त्यांनी राहुल गांधींशी ममता बॅनर्जींनी यूपीएबाबत केलेल्या वक्तव्यासोबतच अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना बैठकीदरम्यान,  त्यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीचं नेतृत्त्व करावं, अशी इच्छाही बोलून दाखवली. 


बैठकीनंतर संजय राऊत म्हणाले की, "राहुल गांधी यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. भेटीदरम्यान, जी चर्चा झाली ती स्वाभाविकच राजकीय मुद्द्यांवर होती. सर्व काही ठिक आहे. परंतु, जी काही चर्चा झाली त्याबाबत सर्वात आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार, त्यानंतरच माध्यमांशी याबाबत बोलणार. परंतु, एवढं नक्की आहे की, एकजूट असलेला विरोधी पक्ष असला पाहिजे, असं शिवसेनेचं मत आहे."


संजय राऊतांनी पुढे बोलताना म्हटलं की, राहुल गांधींसोबत बैठकी दरम्यान, ममता बॅनर्जींनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यावरही चर्चा झाली. ते म्हणाले की, "राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. तोपर्यंत जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामकाजास सुरुवात केली, तर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकते."


काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी शक्य नाही : संजय राऊत 


संजय राऊत म्हणाले की, "काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी शक्य नाही. विरोधकांची एकच युती व्हावी, त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत." पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, "तुम्ही पुढाकार घ्या, असे राहुलजींना सांगितले. आगामी निवडणुकांबाबतही चर्चा झाली. राष्ट्रीय राजकारणावर बोललो. टीएमसी आणि काँग्रेसला एकत्र आणण्यासाठी शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते पुरेसे आहेत, असंही बोलणं झालं." दरम्यान, आज संजय राऊत काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांचीही भेट घेणार आहेत. . कई फ्रंट हुए तो काम नहीं चलेगा.


दरम्यान, एकीकडे काँग्रेस आणि तृणमूलमधला दुरावा वाढत असला तरी, शिवसेना-काँग्रेसमधील जवळीक वाढताना दिसतेय. शिवसेना खासदार संजय राऊतांनी काल राहुल गांधींची भेट घेतली, तर आज प्रियंका गांधींची भेट घेणार आहेत. 5 राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. त्यात यूपीएचं समर्थन केल्यानंतर या भेटींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. विशेषत: उत्तर प्रदेशात शिवसेना काँग्रेसला मदत करणार का? याबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहा एबीपी माझा युट्यूब लाईव्ह