लखनऊ: उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये जम्मू काश्मीर पोलिसांनी लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. संदीप कुमार शर्मा असं या दहशतवाद्याचं नाव असून तो अदिल या नावानं वावरत होता.


संदीप कुमार मुजफ्फरनगरचाच रहिवासी आहे. एटीएम फोडणे आणि बँक लुटण्याबरोबरच शस्त्रात्रांचीही त्यानं याआधी चोरी केली आहे.

संदीप हा गुन्हेगार असून तो शोपूरच्या शकूर नावाच्या व्यक्तीमार्फत लष्कर ए तोयबाच्या संपर्कात होता, अशी माहिती पोलिस निरीक्षकांनी दिली आहे.

कोण आहे संदीप शर्मा?

संदीप राम शर्मा उर्फ आदिल. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी. काश्मीर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. संदीप मूळचा मुझफ्फरनगरचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विशेष म्हणजे, गेल्या 28 वर्षात प्रथमच एका बिगर काश्मिरी व्यक्तीला काश्मीरमधील दहशतवादी कारवायांबद्दल अटक करण्यात आली आहे.

संदीप काश्मीरच्या बाहेरचा असल्यानं त्याच्याबद्दल कोणालाही संशय येत नव्हता.  याचाच फायदा संदीपनं उचलला. मुझफ्फरनगरमध्ये राहून संदीप शर्मानं वेल्डिंगचं काम शिकला. उन्हाळ्यात तो काश्मिर खोऱ्यात वेल्डिंगचं काम करायचा. तर हिवाळ्यात पंजाबच्या पटियालामध्ये आश्रय घ्यायचा.

जून महिन्यात काश्मीरमध्ये पोलीस उपनिरीक्षक फिरोज डार यांच्यासह सहा पोलिसांची हत्या केल्याचा आरोप संदीप शर्मावर आहे.  या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचा कमांडर बशीर लष्करी आणि संदीप शर्मा दोघंही सक्रीय होते.

जुलै महिन्यात भारतीय सैन्यानं बशीर लष्करीचा खात्मा केला. ज्यात संदीप शर्माला पळून जाण्यात यश मिळालं. संदीप शर्मा हा बशीर लष्करीचा जवळचा सहकारी होता.

नोटाबंदी झाल्यानंतरही दशतवाद्यांकडे नव्या कोऱ्या नोटा आल्याच्या बातम्या आल्या. त्याचं गुपित संदीप शर्माच्या कारवायात आहे. संदीप शर्मा एटीएमची लूट करायचा, आणि ती रसद लष्कर ए तोयबाला पुरवायचा.

लष्कर ए तोयबा, आयसिस किंवा मुजाहिद्दीन अशा संघटना भारतीय तरुणांना दहशतीच्या जाऴ्यात ओढतात. त्याचे शेकडो नमुने आणि पुरावे सध्या भारतीय तुरुंगांमध्ये आहेत.

पण यावेळी धोका जास्त गडद होताना दिसतोय, कारण भारतीय तरुणांना दहशतीच्या मार्गावर वळवण्याचं औषध दहशतवाद्यांना सापडलंय. ज्याचा बिमोड करण्याचं आव्हान भारतीय यंत्रणांसमोर आहे.

 ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई