नवी दिल्ली : न्यायमूर्ती लोढा समितीने अनुराग ठाकूर यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. भारतीय क्रिकेटमध्ये सुधारणा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीची स्थापना केली आहे.
बोर्ड सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत नसल्याचं सांगत लोढा समितीने बोर्डाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
लोढा समितीने बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला 6 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे.
'BCCIमध्ये मंत्री, शासकीय कर्मचाऱ्यांना स्थान नको', लोढा समितीची सूचना
लोढा समितीने आज सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे. बीसीसीआय लोढा समितीच्या शिफारशी तसंच बीसीसीआयच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी सुचवलेले उपाय लागू करत नाही, असं लोढा समतिच्या अहवालात म्हटलं आहे. याशिवाय बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बदलण्याची मागणी केली आहे. तसंच बोर्ड समितीच्या शिफारशींची पूर्तता करण्याच्या मार्गात अडथळा आणत असल्याचं अहवालात नमूद केलं आहे.
यानंतर सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला फटकार लगावत म्हटलं की, जर बोर्ड स्वत:ला कायद्यापेक्षा श्रेष्ठ समजत असेल तर ते चुकीचं आहे. सुप्रीम कोर्टाने बोर्डाला आदेशाचं पालन करण्यासाठी बजावलं आहे.