नवी दिल्ली : भाजपचे नेते आणि हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज हे कायमच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडणारं वक्तव्य केले आहे. ‘साबरमती के संत’ या हिंदी गाण्यामुळे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांचा अपमान होतो आहे, असे अनिल विज यांचं म्हणणं आहे.
हरियाणातील अंबाला कँट येथील सुभाष पार्कमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
‘दे दी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल’ या गाण्यात ब्रिटिशांविरोधात सशस्त्र संघर्ष करणाऱ्या शूरवीरांचा उल्लेख न केल्याने, त्यांचा एकप्रकारे अपमान झाल्याचं विज यांचं म्हणणं आहे.
“हे गाणं खऱ्या इतिहासाला चित्रित करत नाही. सुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद सेना, भगतसिंह, चंद्रशेखर आझाद, राजगुरु, सुखदेव आणि अन्य वीर ज्यांनी ब्रिटिशांविरोधात संघर्ष केला. आपलं बलिदान दिलं. अशावेळी ‘दे दी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल’ असे बोलणं म्हणजे त्यांचा अपमान आहे.”, असे विज यांनी म्हटले.
बेजबाबदार वक्तव्य करणं ही अनिल विज यांची सवय असल्याचे म्हणत काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
विशेष म्हणजे, अनिल विज यांनी याआधीही राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे.
‘दे दी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल’ हे गाणं 1954 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जगृती’ सिनेमातील आहे.