नवी दिल्ली : तब्बल 19 वर्षांनंतर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे. पक्षाध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. आज सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीचं दिल्लीत आयोजन करण्यात आलं असून, या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.


काँग्रेस पक्षाच्या नव्या अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी तारीख ठरवण्यासाठी सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीची आज सकाळी 10.30 वाजता बैठक आयोजित केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गुजरात निवडणुकीच्या आधीच राहुल गांधी यांच्या खांद्यावर पक्षाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाईल.

काँग्रेसच्या आजच्या कार्यकारिणी बैठकीत पक्षाध्यक्ष निवडणुकीच्या तारखेसह, निवडणूक अधिसूचना, उमेदवारांचे अर्ज, अर्ज परत घेण्याची तारीख, मतदान या गोष्टींची घोषणा केली जाईल.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पक्षाध्यक्षपदासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य मतदान करतात. मात्र सध्याची स्थिती पाहता, राहुल गांधी यांच्यासमोर कुणीच उमेदवार आव्हान उभे करणार नसल्याने, ही निवडणूक एकतर्फी आणि बिनविरोध होण्याचीच अधिक शक्यता आहे.

गेल्या काही दिवसात देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील प्रदेश काँग्रेसने ठराव संमत करुन, राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपद सोपवण्याबाबत मागणी केली आहे.

काँग्रेसच्या नव्या अध्यक्षपदी राहुल गांधींची निवड झाल्यानंतर, खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल आणि त्यांच्या नेतृत्त्वात नवी कार्यकारिणी निवडली जाईल. काँग्रेस कार्यकारिणी ही पक्षांतर्गत निर्णय घेणारी महत्त्वाची समिती आहे.

काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदी 1998 पासून सोनिया गांधी आहेत. 47 वर्षीय राहुल गांधी 2004 साली पहिल्यांदा उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघातून संसदेत निवडून गेले. त्यानंतर 2004 पासून आजतागायत ते अमेठीचं नेतृत्व करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधींनी गुजरात निवडणुकीत प्रचाराचा धुरळा उडवला आहे. मोदींचं होमग्राऊंड असूनही, राहुल गांधींनी भाजपला नाकीनऊ आणले आहे.