अहमदाबाद : काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण बळ लावलं आहे. उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर काही वेळातच 30 जण असलेल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह दिग्गजांचा समावेश आहे.


माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे देखील गुजरात निवडणुकीत प्रचार करताना दिसतील. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, अशोक गहलोत, अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, सॅम पित्रोदा, नवज्योत सिंह सिद्धू, राज बब्बर, सचिन पायलट यांच्यासह अनेक दिग्गज गुजरातमध्ये काँग्रेसचा प्रचार करणार आहेत.



काँग्रेसची पहिली यादी जाहीर

काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदावारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 77 उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. भाजपने दोन याद्या जाहीर केल्यानंतर काँग्रेसने उमेदावारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे.

हार्दिक पटेल काँग्रेसला पाठिंबा देण्याची औपचारिक घोषणा करणार आहे. त्यामुळे काँग्रेसने पाटीदार समाजाच्या नेत्यांनाही तिकिट दिलं आहे. पाटीदार आरक्षण आंदोलन समितीचे संयोजक ललित वसोया यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आरक्षणासहित इतर मुद्द्यांच्या अटीवर पाटीदार आरक्षण आंदोलन समिती अर्थात PAAS ने काँग्रेसने पाठिंबा देण्याचं मान्य केलं आहे. याची औपचारिक घोषणा केली जाणार आहे.