नवी दिल्ली : नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात नेमकी कुठली शॉक ट्रीटमेंट असणार याबाबत उत्सुकता होती. त्यात मोदींनी 20 नवे चेहरे घेतले. बऱ्याच दिग्गजांना नव्या टीममधून वगळलं. सुषमा स्वराज, सुरेश प्रभू आणि राज्यवर्धनसिंह राठोड यांना वगळल्यामुळे कुजबुज झाली. पण त्यापेक्षा जास्त चर्चा आणि जगभरातील कूटनितीकारांमध्ये खळबळ उडाली ती एस.जयशंकर यांच्या नावामुळे.
एस. जयशंकर. वय फक्त 64. बारीक कापलेले केस, चेहऱ्यावर दाढीचे खुंट, डोळ्यांवर रिमलेस चष्मा आणि डिप्लोमॅट्सना शोभणारी धीरगंभीर मुद्रा. प्रचंड मितभाषी.
खरंतर एस.जयशंकर हे नाव पत्रकारांना चांगलंच परिचित आहे. कारण मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी परराष्ट्र खाते सुषमा स्वराज यांच्याकडे दिले. पण 2015 साली एस.जयशंकर यांना परराष्ट्र सचिव नेमून आपला वरचष्मा कायम ठेवला.
त्यामुळे गेल्या चार वर्षात राजनितीक कूटरचना आणि परदेशांमधून येणाऱ्या पाहुण्यांसोबत जयशंकर कायम टीव्ही किंवा वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर असायचे.
गेल्या वर्षी ते निवृत्त झाले आणि टाटा सन्सच्या बोर्डावर गेले. व्ही.के.सिंह, आर.के.सिंह किंवा सत्यपाल सिंह यांच्यासारख्या सनदी अधिकाऱ्यांप्रमाणे ते निवडणुकीच्या राड्यात उतरले नाहीत. राजकारण, राजकारणी आणि राजकीय पक्षांपासून ते दूर होते. पण काल सहा वाजता एस.जयशंकर थेट अवतरले ते शपथविधीच्या व्यासपीठावर.
काळा सूट आणि हातात मोबाईल. चेहरा नेहमीप्रमाणेच गंभीर. कायम मोबाईलमध्ये काही ना काही बघत असताना ते कॅमेऱ्यात दिसत होते.
सहा वाजेनंतर सुषमा स्वराज आल्या. नेहमीप्रमाणे त्यांनी पाहुण्यांना नमस्कार, चमत्कार केला. आणि व्यासपीठावर न येता त्या सन्माननीय पाहुण्यांसाठी असलेल्या पहिल्या रांगेत बसल्या. तिथेच एस.जयशंकर त्यांची जागा घेत असल्याचे आधोरेखित झाले होते.
पण एस. जयशंकर इथवर पोहोचले कसे? हा प्रश्न आहेच. कारण नरेंद्र मोदींचा विश्वास संपादन करणे तितकसे सोपे नाही. त्यातही परराष्ट्र खात्यासारखे महत्त्वाचं खाते जयशंकर यांच्याकडे देणे हा जगभरातल्या देशांना भारताने दिलेला एक संदेश आहे. यापुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठल्याही राजकीय कूटनीतीत भारताला गृहित धरणे शक्य होणार नाही.
तर आता या जयशंकर यांचा प्रवासही पाहा...
एस.जयशंकर यांचे कुटुंब मूळचं दक्षिणेतले. वडील के.जयशंकर हे सनदी अधिकारी होते. परराष्ट्र नीतीत त्यांचा शब्द महत्त्वाचा मानला जायचा. त्यामुळे भारताचे इतर देशांशी असलेले संबंध, कूटनीती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे असलेले महत्त्व याचे बाळकडू त्यांना लहाणपणीच मिळाले होते.
एस.जयशंकर यांचा जन्म दिल्लीतलाच. एअरफोर्स स्कूलमधून त्यांनी आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या स्टिफन कॉलेजातून पदवी पूर्ण केली. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्यांनी ज्या JNU वर मोदींचा निशाणा आहे, त्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाची निवड केली.
पॉलिटिकल सायन्समध्ये MA आणि पीएचडी पूर्ण केली. काही काळ त्यांनी पत्रकारितेतही हात आजमावला. पण 1977 साली ते UPSC उत्तीर्ण झाले आणि परराष्ट्र सेवेत दाखल झाले. 1979 साली ते सोव्हिएत युनियनमधील भारताचे सचिव म्हणून मॉस्कोला गेले. तिथे त्यांनी रशियन भाषेचा अभ्यास केला. सुरुवातीच्या काळातच त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. त्यामुळे मॉस्कोपासून 5 हजार किलोमीटर दूर असलेल्या भारतीय परराष्ट्र खात्यातही त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.
परराष्ट्र सेवेत दाखल झाल्यानंतर जयशंकर यांनी मागे वळून पाहिले नाही. सिंगापूर, जपान, चीन, अमेरिका यांसारख्या देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून त्यांनी काम केले. यावेळी भारताचे संबंध उत्तम राहतील आणि मानसन्मानही कायम राहील याची काळजी जयशंकर यांनी घेतली.
जयशंकर यांच्या कामाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सरकारमधील प्रमुखांशी त्यांचे असलेले संबंध. त्यांनी आपल्या कर्तव्यात कधीही राजकारण आणले नाही. देश सर्वोपरी ठेऊन देशाच्या हिताचे निर्णय घेतले. दिल्लीत कुणाचंही सरकार असलं तरी भारताचं हित हेच त्यांच्यासाठी सर्वोच्च होते.
त्यामुळेच एस.जयशंकर यांच्याबद्दल सरकारमध्ये कधीही किंतु-परंतुची भावना नव्हती. त्यांच्या कामाबद्दल शंका नव्हती.
हार्ड निगोशिएटर..
परराष्ट्र सेवेत काम करताना पॉलिटिकल निगोशिएशन किंवा बार्गेनिंगला प्रचंड महत्व असते. त्यात जयशंकर यांचा हात कुणीही धरु शकत नाही.
2004 ते 2007 या कार्यकाळात जयशंकर हे परराष्ट्र खात्यात सहसचिव म्हणून काम करत होते. सरकार होते मनमोहन सिंह यांचे. अमेरिकेशी अणुकरार करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु होतं. देशात डाव्यांचा विरोध होता. त्यांनी सरकारचा पाठिंबा काढला. अमेरिकेने अटी-शर्थी खूपच कडक आणि भारतासाठी कठीण असतील अशा केल्या. पण त्यावेळी भारताकडून त्याचा ड्राफ्ट तयार करण्याची आणि वाटाघाटी करण्याची आणि दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या पातळीवर बोलणी स्मूथ करण्याची जबाबदारी एस.जयशंकर यांनी लिलया पार पाडली.
त्यामुळेच मनमोहन सिंह एका बाजूला सरकार वाचवण्याची आणि दुसऱ्या बाजूला देशाला अणुशक्तीने बलदंड करण्याची कमाल करु शकले.
त्यांच्या याच कामगिरीमुळे मनमोहन सिंह यांना जयशंकर परराष्ट्र सचिव म्हणून हवे होते. पण सेवाज्येष्ठतेचा प्रश्न पुढे आला. परराष्ट्र खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनमोहन यांच्या योजनेला विरोध केल्याने ते प्रकरण तिथेच थांबलं.
चीनशी आपलं विळ्या-भोपळ्याचं वैर आहे. भारताला कात्रीत पकडण्याची एकही संधी चीन सोडत नाही. पण जयशंकर यांनी परराष्ट्र खात्याचा भार स्वीकारला तेव्हा त्यांनी चीनशी व्यापार, संस्कृती आणि सीमेवरील तणावावर शांतपणे तोडगा काढण्यात यश मिळवले.
अगदी मधल्या काळात डोकलाममध्ये जेव्हा चीनने आगळीक सुरु केली, तेव्हा भारताची मान खाली जाईल अशी भीती होती. मात्र जयशंकर यांनी तिथेही उत्तमपणे भारताची बाजू मांडली. आणि चीनला वेळीच रोखण्यात यश मिळवले.
2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, तेव्हा जयशंकर अमेरिकेत भारताचे राजदूत होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते बराक ओबामा. मोदींचा पहिलाच अमेरिका दौरा होता. तो यशस्वी करण्याची जबाबदारी जयशंकर यांच्यावर होती. 2002 मुळे मोदींची डागाळलेली इमेज आणि अमेरिकेत असलेले ओबामाराज हे त्रांगडं सोपं नव्हतं. त्यावेळी जयशंकर यांनी मोदींची इमेज बिल्ड केली. इतकेच नव्हे तर अमेरिकेतील भारतीय उद्योजकांशी संवाद घडवून आणला. नरेंद्र मोदींनी अमेरिकेतील NRI शी मॅडिसन स्क्वेअरवरून साधलेला संवादही त्याचाच एक भाग होता. आणि ओबामांना भारतात आमंत्रित करुन जयशंकर यांनी आपल्या कामाचा ठसा ठळक केला.
त्यामुळेच 2015 मध्ये जयशंकर निवृत्त होण्याआधी चार दिवस मोदींनी त्यांना थेट भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्त केलं. त्यासाठी त्यांनी सुजाता सिंह यांना घरी पाठवले. 2017 मध्येही जयशंकर यांना आणखी एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. ही कमाल क्वचितच आतापर्यंतच्या कुठल्या परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्याने केली असेल.
आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्या 4 वर्षात भारताची मान उंचावली आहे, त्याला एस.जयशंकर आणि नरेंद्र मोदींची लाजवाब केमिस्ट्रीच कारणीभूत असल्याचे परराष्ट्र खात्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी सांगतात. पेचप्रसंगातून मार्ग काढण्याचे त्यांचे कसब आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या शब्दाला असलेले वजन यामुळे जयशंकर मोदींचे फेव्हरेट असल्याचे बोलले जाते.
परंतु एखादा सनदी अधिकारी म्हणून काम करणे आणि मोदींच्या टीममध्ये राजकारणी म्हणून काम करणे या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.
एकाचवेळी मोदींना भारताला विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यापार उदीमात प्रगतीकडे न्यायचे आहे, आणि त्याचवेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची हिंदुत्ववादी प्रतिमाही निर्माण करायची आहे. त्यामुळे जयशंकर यांच्यासाठी ही तारेवरची कसरत असणार आहे.
शिवाय पाकिस्तानच्या वाढत्या आगळीकींना वेसण घालणे आणि चीनला धाकात ठेवण्यासाठीही जयशंकर यांना आपले कसब पणाला लावावे लागेल.
जयशंकर हे परराष्ट्र सेवेतील अधिकारी म्हणून प्रत्येक सरकारच्या आणि मोदींच्याही गुडबुक्समध्ये राहिले, आता देशाचे परराष्ट्रमंत्री म्हणून काम करताना त्यांची कामगिरी कशी असणार आहे, याची उत्सुकता आहे.
Getty Images)
एस.जयशंकर... जेएनयूचे विद्यार्थी, पत्रकार, परराष्ट्र सचिव ते परराष्ट्र मंत्री!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 May 2019 06:52 PM (IST)
नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात 20 नवे चेहरे दिसले. सुषमा स्वराज, सुरेश प्रभू आणि राज्यवर्धनसिंह राठोडसारख्या बऱ्याच दिग्गजांना मंत्रिमंडळातून वगळल्यामुळे कुजबुज झाली. पण त्यापेक्षा जास्त चर्चा आणि जगभरातील कूटनितीकारांमध्ये खळबळ उडाली ती एस.जयशंकर यांच्या नावामुळे.
Getty Images)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -