इंदिरा गांधींनंतर देशाच्या सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी पहिल्यांदाच एका महिला मंत्र्याच्या खांद्यावर आली आणि देशासाठी ही अभिमानाची बाब ठरली होती. 2017 मध्ये मनोहर पर्रिकर यांची तब्येत काहीशी खालावली होती. त्यातच दिल्लीत मन रमत नसल्याने गोव्याच्या सांभाळ करण्यासाठी पर्रिकर परतले. त्यावेळी वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री असलेल्या निर्मला सीतारमण यांच्याकडे थेट संरक्षण मंत्रालयाचा कारभार सुपूर्द करण्यात आला. त्या 2016 मध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.
दोन वर्षांच्या कालावधीत संसदेत राफेलच्या मुद्द्यावरुन धुरळा उठला, तेव्हा निर्मला सीतारमण यांनी निकराने खिंड लढवली. खुद्द शाह-मोदी यांनीही निर्मला सीतारमण यांचं कौतुक केलं होतं. वैद्यकीय कारणामुळे गेल्या वेळी अरुण जेटली यांच्या अर्थ मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी पियुष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आली होती. आता अर्थ मंत्रालयाचा भार वाहण्यासाठी निर्मला सज्ज आहेत.
निर्मला सीतारामन यांचा परिचय
तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीत मध्यमवर्गीय कुटुंबात निर्मला यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959 रोजी झाला. त्यांचे वडील रेल्वेमध्ये नोकरी करत होते. सातत्याने बदली होत असल्यामुळे निर्मला यांचे बालपण अनेक गावांमध्ये गेलं. निर्मला यांच्या आईला वाचनाची प्रचंड आवड होती. त्यातूनच निर्मला यांनाही गोडी लागली.
तामिळनाडूमध्ये बीए पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिल्लीतील जेएनयू अर्थात जवाहरलाल नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला आणि एक हुशार विद्यार्थिनी असा लौकिक मिळवला. अर्थशास्त्र विषयात निर्मला यांनी मास्टर्स डिग्री संपादन केली.
परिवाराला काँग्रेस पक्षाचा राजकीय वारसा
आंध्र प्रदेशातील राजकीय नेते परकला प्रभाकर यांच्याशी 1986 साली निर्मला विवाहबद्ध झाल्या. प्रभाकरसुद्धा जेएनयूचे विद्यार्थी होते. विशेष म्हणजे प्रभाकर यांच्या घरात काँग्रेस पक्षाचा राजकीय वारसा चालत आलेला आहे.
त्यानंतर काही काळ त्या लंडनला स्थायिक झाल्या. पण तिथं फार काळ मन न रमल्यामुळे त्या पुन्हा मायदेशात परत आल्या. 2003 ते 2005 दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगासाठी काम करताना त्या सुषमा स्वराज यांच्या संपर्कात आल्या. नवरा आणि सासरचं कुटुंब काँग्रेसी विचारांचं असूनही 2006 मध्ये निर्मला भाजपात आल्या.
निर्मला सीतारामन यांची भाजपच्या प्रवक्त्या असतानाची कारकीर्द गाजली. मितभाषी पण तिखट प्रतिक्रियांसाठी त्या प्रसिद्ध होत्या. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मात्र त्यांनी बोलणं कमी आणि काम जास्त हा फंडा अवलंबला. त्यामुळे मोदींच्या विश्वासू मंत्र्यांमध्ये त्यांची गणती होऊ लागली. आणि त्याच कष्टाचं फळ म्हणून टास्कमास्टर, बुद्धिमान आणि हुशार सीतारमण यांना संरक्षण खातं मिळालं.
सीतारमण यांच्यासाठी संरक्षण ही लॉटरीपेक्षा जबाबदारी जास्त होती सीमेपलीकडून पाकिस्तान आणि चीन रोज नव्या कुरापती करत आहे. दुसरीकडे काश्मीर गेल्या काही वर्षांपासून धगधगतंय. अशावेळी संरक्षणमंत्री म्हणून निर्मला सीतारमण यांची कसोटी लागली.
मोदी 2.0 खातेवाटप
नरेंद्र मोदी 2.0 सरकारमध्ये अमित शाह यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सीतारमण यांच्या मंत्रालयाचा खांदेपालट करण्यात आला आहे. राजनाथ सिंह संरक्षण मंत्रालयाची धुरा सांभाळतील. सुब्रह्मण्यम जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालय सुपूर्द करण्यात आलं आहे. पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे, तर नितीन गडकरी यांच्याकडील भूपृष्ठ वाहतुकीची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेल्या स्मृती इराणी महिला आणि बालकल्याण विभागाचं कामकाज पाहतील.
प्रकाश जावडेकर यांना पर्यावरण आणि वने विभाग पुन्हा देण्यात आला आहे. शिवसेनेच्या वाट्याला पुन्हा अवजड उद्योग मंत्रालय आलं आहे. अनंत गितेंनंतर यंदा सेना खासदार अरविंद सावंत या मंत्रालयाची जबाबदारी सांभाळतील. गेल्या वेळी गितेंना अवजड उद्योग मंत्रिपद दिल्यामुळे शिवसेनेत नाराजी होती. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा राज्यमंत्री आहेत. तर अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना मनुष्यबळ विकास, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्रिपद मिळालं आहे.