नवी दिल्ली : आयएमडीने (इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट) देशभरातल्या शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना सुखावणारी बातमी दिली आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार यंदा देशभरात समाधानकारक पर्जन्यमान असेल. जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल. आयएमडीने पावसाबाबतचा आज दुसरा अंदाज व्यक्त केला.


हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार दक्षिण भारतात सरासरीच्या 97 टक्के तर ईशान्य भारतात 91 टक्के पावसाचा अंदाज आहे. उत्तर आणि पश्चिम भारतात 94 टक्के पाऊस पडेल. मध्य भारतात पाऊस चांगलाच बरसणार आहे. मध्य भारतात 100 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अयएमडीने स्पष्ट केले होते की, पर्जन्यमानावर अल निनोचा इफेक्ट असेल, परंतु त्याला नॉर्मलाईज करणारा आयओडी ( इंडियन ओशियन डायपोल) यावेळी कार्यरत असल्याने फार प्रभाव पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे पाऊस समाधानकारक असेल.

राजकीय नेत्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत, शेतकऱ्यांपासून कॉर्पोरेट कंपन्यांच्या सीईओपर्यंत आणि अर्थतज्ज्ञांपासून ते शेअर बाजारातल्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्व जण मान्सूनच्या या अंदाजाकडे डोळे लावून बसले होते. आयएमडीच्या या अंदाजानंतर सर्वांना दिलासा मिळाला.

केरळमध्ये मान्सून 6 जूनला धडकणार, आयएमडीचा अहवाल | एबीपी माझा 



काय आहे अलनिनो?
पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा वाढते या घटनेला अलनिनो म्हटले जाते. ही घटना दक्षिण अमेरिकेतील पेरु या देशाच्या समुद्रकिनारपट्टीवर दिसते. मागील काही वर्षांपासून पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाच्या तापमानात वाढ होत आहे. अलनिनोमुळे समुद्राच्या वाऱ्यांची दिशा बदलते. परिणामी पर्जन्यक्षेत्रात पाऊस पडत नाही. याउलट ज्या परिसरात पाऊस पडत नाही, तिथे मुसळधार पाऊस पडतो.


सरासरी पाऊस म्हणजे किती?
887.5 मिमी पाऊस सरासरी मानला जातो, त्याच्या 19 टक्के कमीअधिक पाऊस पडला तरी तो सरासरी इतका मानला जातो.
गेल्या वर्षी सरासरीच्या 106 टक्के म्हणजे सरासरीच्या जास्त पाऊस पडेल, असा IMD चा पहिला अंदाज होता.
देशभरात 862 मिमी पाऊस पडला, जो सरासरीच्या 3 टक्के कमी होता. तरी त्याला तांत्रिकदृष्ट्या सरासरीच मानलं गेलं.
2014 आणि 2015 ही दोन्ही वर्ष महाराष्ट्रासाठी टंचाईची/दुष्काळसदृश, मराठवाड्यात भीषण स्थिती होती. 2014 मध्ये सरासरीच्या 12 टक्के कमी म्हणजे 781.8, तर 2015 मध्ये सरासरीच्या 14 टक्के कमी म्हणजे 760.6 मिमी एवढा पाऊस पडला.