नवी दिल्ली: गेल्या दशकभरात भारताचे नागरिकत्व सोडून परदेशात स्थायिक होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 11 वर्षांत सुमारे 16 लाख नागरिकांनी भारताचे नागरिकत्व सोडलं असून त्यांनी इतर देशांमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 2022 मध्ये म्हणजे, गेल्या वर्षी 2 लाख 26 हजार 620 इतक्या नागरिकांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला. ही संख्या आतापर्यंतची सर्वाधिक मोठी संख्या आहे. या नागरिकांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग का केला याचं कारण मात्र परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं नाही. गुरुवारी राज्यसभेमध्ये विचारलेल्या एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ही माहिती दिली. 


राज्यसभेत सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, 2011 पासून 16 लाखांहून अधिक भारतीयांनी आपले भारतीय नागरिकत्व सोडलं आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलं आहे की, 2015 मध्ये भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या 1,31,489 होती. तर 2016 मध्ये 1,41,603 लोकांनी आपले नागरिकत्व सोडले. 2017 मध्ये ही संख्या 1,33,049 इतकी होती. सन 2018 मध्ये ही संख्या 1,34,561 होती, तर 2019 मध्ये 1,44,017, 2020 मध्ये 85,256 आणि 2021 मध्ये 1,63,370 भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले होते. गेल्या वर्षी ही संख्या सर्वाधिक असून, 2,25,620 भारतीयांनी आपलं नागरिकत्व सोडलं. 


 






गेल्या 11 वर्षामध्ये, 16 लाख भारतीय नागरिकांनी जगभरातील 135 देशांमध्ये स्थलांतरित व्हायचा निर्णय घेतला. गेल्या तीन वर्षात पाच नागरिकांना संयुक्त अरब अमिरातीने नागरिकत्व दिल्याचं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिलेल्या माहितीतून समोर आलं आहे. 


गेल्या वर्षी संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं होतं की, 2016 साली 1106 परकीय लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं होतं. तसेच 2017 साली 628, 2018 साली 628 , 2019 साली 987 आणि  2020 साली 639 लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं आहे.


भारताचे नागरिकत्व सोडून अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारण्याकडे नागरिकांचा सर्वाधिक कल असल्याचं एका अहवालातून स्पष्ट होतंय. त्यानंतर भारतीयांची पसंती ऑस्ट्रेलियाला आहे.  तिसऱ्या क्रमांकावर कॅनडा हा देश आहे. तर चौथ्या क्रमांकावर ब्रिटन या देशाला पसंती आहे. एका आकडेवारीनुसार, 1.35 कोटीहून अधिक भारतीय नागरिक सध्या परदेशात वास्तव्य करत आहेत. 


 


ही बातमी वाचा: