Lithium Mines in India : भारतात पहिल्यांदाच काश्मीरमध्ये लिथीयमचा (Lithium) साठा आढळला आहे. जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने (GSI) गुरुवारी ही माहिती दिली. देशात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर लिथीयमचा साठा सापडला आहे. लिथीयमचा साठा आढळल्याने भारतातील इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicle) आणि मोबाइल बॅटरी (Mobile Battery) निर्मिती क्षेत्राला मोठा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. लिथीयमसाठी भारताला इतर देशांवर अवलंबून राहावे लागत आहे. या साठ्यामुळे लिथीयमबाबत काही प्रमाणात भारत आत्मनिर्भर होऊ शकतो.
जम्मू-काश्मीरमध्ये 59 लाख टनचा साठा
जम्मू-काश्मीरमधील (Jammu And Kashmir) रियासी जिल्ह्यात हा लिथीयम मेटलचा साठा मिळाला आहे. हा साठा जवळपास 59 लाख टन इतका असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशात लिथियमचा साठा उपलब्ध असल्याने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्र आणि मोबाईल फोन उत्पादन क्षेत्राला बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे. लिथियम धातूचा नियमित पुरवठा राखल्यास इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी योजना तयार करण्यात मदत होईल.
या देशांमधून भारत करतो आयात लिथीयम
इलेक्ट्रिक वाहने आणि मोबाईल फोन यांसारख्या उपकरणांसाठी बॅटरीच्या निर्मितीमध्ये लिथियम धातूचा वापर केला जातो. भारतात बॅटरी बनवण्यासाठी आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिनासारख्या देशांतून लिथियम आयात केले जात होते. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचा साठा उपलब्ध असल्याने परदेशातून होणाऱ्या आयातीत घट होणार आहे. लिथीयमची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहने आणि मोबाइल फोनसाठी बॅटरी तयार करण्यासाठी आता भारत जम्मू आणि काश्मीरमधील लिथीयम साठ्यावर अवलंबून असणार आहे.
इलेक्ट्रिक वाहने उद्योगाला चालना मिळणार?
पर्यावरणपूरक आणि पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीवरील अवलंबित्व करण्यासाठी भारतात इलेक्ट्रिक वाहनांवर भर दिला जात आहे. मागील काही वर्षात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन वाढले आहे. तर, दुसरीकडे देशाता मोबाईल फोन निर्मितीचे कारखाने सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहे. चीनमध्ये कारखाने असणाऱ्या मोबाईल फोन कंपन्यांनी भारतात यावे यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आता भारतात, लिथीयमचा साठा आढळल्याने इलेक्ट्रिक वाहने आणि मोबाईल बॅटरी निर्मिती उद्योगाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, लिथीयमची आयात कमी झाल्याचा परिणाम वाहनांच्या किंमतीवर होणार आहे. इलेक्ट्रिक वाहने आणखी स्वस्त होऊ शकतात. त्याशिवाय, आयात कमी झाल्याने भारताची परकीय गंगाजळीदेखील वाचणार आहे.
इतर महत्त्वाची बातमी :