मुंबई : काँग्रेस खासदार रजनीताई पाटील (Rajni Patil) यांचं निलंबन करण्यात आलं आहे. सभागृहातील विरोधकांच्या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित अधिवेशनासाठी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांच्या सभागृहातील भाषणादरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला होता. विरोधकांच्या गोंधळाचा व्हिडीओ चित्रित केरून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी रजनीताई पाटील यांना निलंबीत करण्यात आले आहे. उर्वरित अधिवेशनासाठी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना निलंबन करण्याची सत्ताधारी पक्षाने मागणी केली होती. 


राज्यसभेचे सभागृह नेते पियुष गोयल यांनी या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करत आणि वारंवार इशारे देऊनही असे प्रकार घडत असल्याबद्दल तातडीने कारवाई करण्याची मागणी सभापतींकडे केली होती. त्यानंतर रजनीताई पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.






दरम्यान, या कारवाईनंतर खासदार रजनीताई पाटील यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे. "स्वातंत्र्यसैनिकांच्या घरातून मी येते आहे. मला या अधिवेशनासाठी काय पूर्ण टर्म निलंबित करा. परंतु ज्या पद्धतीने भाजपने नाव घेऊन सभागृहात अपमान केला आहे तो सहन करणार नाही, असे रजनीताई पाटील यांनी म्हटले आहे.  


राज्यसभेत अर्थसंकल्पादरम्यान सभागृह नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, काल काही खासदारांनी सभागृहात ज्या प्रकारे व्हिडीओ बनवले ते अत्यंत आक्षेपार्ह होते. अशा लोकांवर कठोर कारवाई व्हायला हवी. यावर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर म्हणाले की, हे माझ्या लक्षात आले असून मी ते गांभीर्याने घेतले आहे. सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यासाठी कारवाई होणे गरजेचे आहे. दरम्यान, या कारवाईवर काँग्रेसने टीका केलीय.  


काँग्रेसकडून आरोप


"चौकशीशिवाय कोणावरही कारवाई करू नये. खासदार रजनी पाटील यांना दबावाखाली निलंबित करण्यात आले आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे. 


 काय प्रकरण आहे?


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (9 फेब्रुवारी) राज्यसभेत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांवर निशाणा साधला होता. यावेळी विरोधी पक्षांनी अदानी प्रकरणाबाबत अदानी-मोदी भाई भाईच्या घोषणा दिल्या. दरम्यान, त्या आधी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की,  'काँग्रेसने देशाचा विकास केला नाही तर फक्त भ्रष्टाचार केला. आज आमच्यावर प्रश्न उपस्थित केले जातात की आम्ही राज्य सरकारला त्रास देतो, पण इंदिरा गांधींनी कलम 356 चा वापर केला होता.