नवी दिल्ली: युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. चंदन जिंदाल असं या 22 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव असून तो मूळचा पंजाबमधील बर्नाला या ठिकाणचा आहे. इस्केमिक स्ट्रोकच्या (Ischemic stroke) आजारामुळे चंदन जिंदालवर विनिस्टीयामधील इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
युक्रेनमधील खारकिव्हमध्ये रशियन सैन्याने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात कर्नाटकमधील नवीन शेखराप्पा या विद्यार्थ्याचे मंगळवारी निधन झाले होते. त्यानंतर आज दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याचे निधन झाल्याने भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
नवीन जिंदालच्या मृत्यूची बातमी त्याच्या कुटुंबियांना कळवण्यात आली आहे. या विद्यार्थ्याच्या वडिलांनी केंद्र सरकारला एक पत्र लिहून आपल्या मुलाचे शव भारतात आणले जावे अशी विनंती केली आहे.
भारतीयांना परत आणण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू
दरम्यान, युक्रेनची राजधानी किव्ह एकीकडे रशियाच्या निशाण्यावर आहे तर दुसरीकडे किव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी भारत सरकारने नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. युक्रेनला लागून असलेले पोलंड , रोमानिया , हंगेरी आणि स्लोव्हाक रिपब्लिकमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या देशांना युक्रेनची सीमा आहे. या कक्षाशी संपर्क साधण्याचं आवाहन भारत सरकारने त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना केलं आहे.
किती भारतीय अडकले?
युक्रेनमध्ये अद्याप 4 हजार भारतीय असल्याचं सांगण्यात येतंय. आतापर्यंत 7 हजार 700 जणांनी यूक्रेनची सीमा रोमानिया, पोलंड, हंगेरी, मोलदोवा, स्लोव्हाकिया देशांच्या माध्यमातून ओलांडली आहे. दोन हजारांच्या जवळपास भारतीय देशात परतले आहेत. विमानतळावर 4 ते 5 हजार भारतीय विमानाच्या बोर्डिंगची वाट पाहात आहे. भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी बुडापेस्ट, बुकारेस्टसोबतच पोलंड आणि स्लोवाकिया देशाच्या विमानतळांचा वापर करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या:
- Russia Ukraine War : मिसाईल हल्ल्यानंतर युक्रेनमधील खारकिव्ह बेचिराख, मन हेलवणारी दृश्य
- Russia-Ukraine War : रशिया युक्रेनशी चर्चेसाठी तयार, दोन्ही देशांमध्ये होणार दुसरी बैठक?
- Crude Price Rise: कच्च्या तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी अमेरिका देणार तीन कोटी बॅरल कच्चे तेल, राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची घोषणा