Ukraine Russia War : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा (Russia-Ukraine War) आज सातवा दिवस आहे. रशियन सैन्य युक्रेनच्या कीव्ह (Kyiv) आणि खारकिव्ह मध्ये (Kharkiv) हल्ले करत आहेत. अशातच, रशियाने युक्रेनसोबत चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर दोन्ही देशांमधील ही दुसरी बैठक असेल. याआधी सोमवारी बेलारूस सीमेवर दोन्ही देशांदरम्यान सुमारे साडेपाच तास बैठक झाली. मात्र, ही बैठक अनिर्णित राहिली.


तिसरे महायुद्ध झाले, तर....
रशिया-युक्रेनमधील युद्धादरम्यान रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी तिसऱ्या महायुद्धाचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, तिसरे महायुद्ध झाले तर त्यात अण्वस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो. असे झाल्यास ते विनाशकारी ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. 24 फेब्रुवारीपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले. यानंतर रशियाने अनेक शहरांना लक्ष्य केले आहे. बुधवारी रशियन सैन्याने कीव्ह आणि खारकिव्हमध्ये हल्ले सुरूच ठेवले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खारकिव्ह शहरात रशियाच्या हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू झाला असून 112 जण जखमी झाले आहेत.


युक्रेनियन सैन्याच्या नुकसानीबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही


कीव्हमध्येही स्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत. रशियन लष्कराने मंगळवारी कीवमधील टीव्ही टॉवरला लक्ष्य केले. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. युक्रेनमधील युद्धात किती लोक मारले गेले याबाबत अधिकृत आकडेवारी नाही. युक्रेनियन अधिकार्‍यांचा अंदाज आहे की, 5,000 हून अधिक रशियन सैन्य एकतर कैद झाले किंवा मारले गेले. युक्रेनियन सैन्याच्या नुकसानीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha