Russia Ukraine War: युक्रेनमधील खारकिव्हमध्ये रशियन सैन्याने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. नवीन शेखराप्पा असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो कर्नाटकातील रहिवासी आहे.
खारकिव्हच्या प्रशासनाने या आधीच सांगितलं होतं की रशियाने या भागातील निवासी भागामध्ये बॉम्ब हल्ला केला. त्यामध्ये नेमकं किती नुकसान झालं याची त्यांनी माहिती दिली नव्हती. आता या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या गोळीबारात जवळपास 11 लोकांचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात येतंय.
भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न
युक्रेनची राजधानी किव्ह एकीकडे रशियाच्या निशाण्यावर आहे तर दुसरीकडे किव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. किव्हमधील दूतावासात आश्रयाला आलेल्या जवळपास 400 विद्यार्थ्यांना युक्रेनबाहेर रवाना करण्यात यश आलंय. आत्तापर्यंत 1000 जणांचं स्थलांतर पूर्ण झालं आहे. काही विद्यार्थी अजूनही किव्हच्या काही भागात आहेत. त्यांनी कर्फ्यू उठताच युक्रेनच्या पश्चिम सीमेकडे जावं असं भारतीय दूतावासानं सांगितलंय.
रशियाकडून व्हॅक्युम बॉम्बचा वापर
रशियानं युक्रेनविरोधातील युद्धात प्रतिबंधित केलेल्या व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केल्याचा आरोप युक्रेननं केलाय. युक्रेनचे अमेरिकेतील राजदूत ओकसाना मार्कारोव्हा यांनी हा दावा केलाय. व्हॅक्युम बॉम्ब सह इतरही प्रतिबंधित शस्त्रांचा वापर रशिया करत असल्याचा युक्रेनमधील मानवी हक्क संघटनांचा आणि युक्रेन सैन्याचा दावा आहे. युक्रेनकडून असा दावा होत असला तरी याबाबत संयुक्त राष्ट्रसंघ किंवा इतर कोणाकडूनही अद्याप अधिकृत वक्तव्य आलेलं नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine War : एकीकडे अणुयुद्धाची तयारी, दुसरीकडे युक्रेनशी चर्चा; अखेर पुतिन यांची योजना काय?
- Ukraine Russia War : तिसरं महायुद्ध झाल्यास कोणत्या देशाची कोणाला साथ? भारताची भूमिका काय?
- Russia Ukraine War : रशियाकडून युक्रेनमध्ये खतरनाक बॉम्बचा वापर, जाणून घ्या काय आहे व्हॅक्यूम बॉम्ब आणि क्लस्टर बॉम्ब?