Russia Ukraine War : युक्रेनच्या सैन्याकडून रशियन फौजांचा कडवा प्रतिकार सुरू आहे. युक्रेनला नमवण्यासाठी रशियाकडून आता घातक बॉम्बचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. युक्रेनच्या राजदूतांनी अमेरिकेत हा आरोप केला आहे. रशियाने युक्रेनमध्ये आता क्लस्टर बॉम्ब (Cluster Bomb) आणि व्हॅक्यूम बॉम्बचा (Vacuum Bombs) वापर करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या बॉम्बचा वापर करण्यास बंदी घातली आहे.  रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्ध सुरू असताना दुसऱ्या बाजूला रशिया आणि युक्रेनमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 


रशियाकडून युक्रेनवर बॉम्ब हल्ले सुरू आहेत. युक्रेनच्या सैन्याचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी रशियाने आता सर्व संकेत पायदळी तुडवण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे नागरिकांनी आश्रय घेतलेल्या एका शाळेवर या खतरनाक बॉम्बचा वापर केला असल्याचा दावा अॅमेस्टी इंटरनॅशनल आणि ह्युमन राइट्स वॉच या संस्थेने केला आहे. 


व्हॅक्यूम बॉम्ब म्हणजे काय?


व्हॅक्यूम बॉम्बला थर्मोबॅरिक अस्त्र म्हणून ओळखले जाते. व्हॅक्यूम बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर हवेतील ऑक्सिजन शोषून घेतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण करणारा स्फोट होतो. हा स्फोट इतर बॉम्बच्या तुलनेत भीषण असतो. या बॉम्बच्या स्फोटाने मानवी शरीराची वाफ होऊ शकते. व्हॅक्यूम बॉम्ब हा बिगर अण्वस्त्र शस्त्रांमधील सर्वात धोकादायक बॉम्बपैकी एक आहे. 


क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय?


क्लस्टर बॉम्ब म्हणजे एक प्रकारे अनेक बॉम्बचा एक गुच्छा असतो. लढाऊ विमानांच्या मदतीने हे बॉम्ब हल्ले केले जातात. हे बॉम्ब ज्या ठिकाणी पडतात, त्या भागातील 25 ते 30 मीटर परिघात मोठ्या प्रमाणावर विद्वंस होतो. 


व्हॅक्यूम बॉम्बच्या वापरास बंदी


व्हॅक्यूम बॉम्बचा वापर शत्रू देशांच्या सैनिकांवर, त्यांच्या ठिकाणांवर केला जातो. सामान्य नागरिकांवर याचा वापर करणे हा युद्ध अपराध समजला जातो. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha