Russia Ukraine War: नवीन शेखराप्पा, मूळचा कर्नाटकातील 21 वर्षाचा विद्यार्थी, युक्रेनमधील खारकिव्हमध्ये खाद्यपदार्थ आणायला गेला आणि त्याला रशियन सैन्याने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला. खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी तो जवळच्या एका सुपरमार्केटमधील रांगेत उभा होता. त्याचवेळी रशियाचा एक बॉम्ब काळ म्हणून आला आणि त्यात त्याचा जीव गेला. 


नवीन शेखराप्पा हा मूळचा कर्नाटकातील हवेरी जिल्ह्यातील. तो युक्रेनमध्ये मेडिकलचा अभ्यास करण्यासाठी गेला. खारकिव्हमधील नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये तो चौथ्या वर्षात शिकत होता. रशियन सैन्याने केलेल्या एका एअरस्टाईकमध्ये त्याचा मृत्यू झाला. 


खारकिव्हमधील शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या समन्वयक असलेल्या डॉ. पूजा यांनी सांगितलं की, नवीन शेखराप्पाचा मोबाईल फोन या हल्ल्याच्या ठिकाणी सापडला. त्याचे प्रेत हे शवगृहात पाठवलं आहे. या घटेनेची माहिती नवीन शेखराप्पासोबत शिकत असलेल्या एका मुलीने दिली. 


परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी नवीन शेखराप्पाच्या घरी पोहोचले असून त्यांनी नवीनचे प्रेत हे शवगृहात पाठवल्याची माहिती त्यांना दिली आहे. असं असलं तरी नवीनचे प्रेत हे भारतात आणणे शक्य आहे याची शाश्वती मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली नाही. 


 






भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न
युक्रेनची राजधानी किव्ह एकीकडे रशियाच्या निशाण्यावर आहे तर दुसरीकडे किव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. किव्हमधील दूतावासात आश्रयाला आलेल्या जवळपास 400 विद्यार्थ्यांना युक्रेनबाहेर रवाना करण्यात यश आलंय. आत्तापर्यंत 1000 जणांचं स्थलांतर पूर्ण झालं आहे. काही विद्यार्थी अजूनही किव्हच्या काही भागात आहेत. त्यांनी कर्फ्यू उठताच युक्रेनच्या पश्चिम सीमेकडे जावं असं भारतीय दूतावासानं सांगितलंय.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha