Milk Price Hike : महागाईने आधीच बिघडलेले किचन बजेट सांभाळणाऱ्या मध्यमवर्गीय, गरीबांना आणखी एक झटका लागणार आहे. 'अमूल' ब्रॅण्डने आजपासून, दरवाढ करण्याची घोषणा केल्यानंतर आता इतर दूधाच्या ब्रॅण्डमध्ये दरवाढ होणार आहे. देशातील प्रमुख एफएमसीजी डेअरी कंपनी पराग मिल्क फूड्स लिमिटेडने (Parag Milk Foods Ltd) आपल्या 'गोवर्धन' दूधाच्या किंमतीत दोन रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. आजपासूनच ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता गोवर्धन गोल्ड दूधाची किंमत 48 रुपयांऐवजी 50 रुपये प्रतिलिटर इतकी झाली आहे. तर, गोवर्धन फ्रेश दूधाची किंमत 46 रुपयांहून 48 रुपये प्रतिलिटर इतकी झाली आहे.
कंपनीचे अध्यक्ष देवेंद्र शाह यांनी सांगितले की, जवळपास तीन वर्षानंतर दूधाच्या दरात वाढ केली आहे. पॅकेजिंग, वाहतूक, पशू चारा आदींच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता दरवाढीशिवाय कोणताच पर्याय नव्हता असेही त्यांनी सांगितले. दूधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. त्याशिवाय, ट्रेड डिस्काउंट आणि इतर खर्चातही कपात करण्यात आली आहे.
मदर डेअरी दूधाच्या दरात वाढ?
मदर डेअरीनेदेखील दूधाची किंमत वाढवण्याचे संकेत दिले आहेत. कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, सध्याच्या स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. कच्च्या मालाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. आता, परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी म्हटले.
अमूलचे दूध महागले
आजपासून 1 मार्च 2022 पासून अमूलने दोन रुपये प्रतिलिटर दरवाढ केली आहे. ही दरवाढ अमूल सोना, अमूल ताजा, अमूल शक्ती, अमूल टी-स्पेशल तसेच गाय आणि म्हशीच्या दुधासह अमूल दुधाच्या सर्व ब्रँडवर लागू झाली आहे. अमूलनं सात महिने 27 दिवसांच्या आत दुधाच्या दरात पुन्हा वाढ केलीय. कच्चा मालाच्या खर्चात वाढ झाल्यानं अमूलनं हा निर्णय घेतलाय. अमूलनं जुलै 2021 मध्ये दुधाच्या किंमती वाढवल्या होत्या.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha