नवी दिल्ली : 'टिक टॉक' युजर्ससाठी एक निराशाजनक बातमी आहे. टिक टॉक अॅप बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण केंद्र सरकारने गूगल स्टोअर आणि अॅपल स्टोअर वरुन 'टिक टॉक' अॅप डिलीट करण्याचे निर्देश दिले आहेत.


टिक टॉक अॅप गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरून हटवण्याची मागणी करणारी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मद्रास हायकोर्टाने या अॅपवर बंदी घातली होती. मात्र मद्रास हायकोर्टांच्या निर्णयानंतर टिक टॉक अॅपच्या कंपनीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टानेही मद्रास हायकोर्टाच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिला.


सुप्रीम कोर्टाने मद्रास हायकोर्टाच्या टिक टॉकवर आणलेल्या बंदीवर स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर केंद्र सरकारने गूगल स्टोअर आणि अॅपल यांना हे अॅप डिलीट करण्याचे निर्देश दिले आहेत.


केंद्र सरकारच्या निर्णयानंतर हे अॅप डाऊनलोड करता येणार नाही. मात्र ज्यांनी अॅप अधीच डाऊनलोड केलं आहे, त्यांना त्याचा वापर करता येणार आहे. याशिवाय टिक टॉकचे व्हिडीओ मीडियाने टेलिकास्ट करु असेही निर्देश कोर्टाने दिले आहेत.


या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठ करत आहेत. प्रकरणाची सुनावणी 22 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.


टिक टॉकची मालकी बाइटडांस कंपनीकडे आहे. अभिषेक मनु सिंघवी यांनी बाइटडांसच्या वतीने अॅपच्या बंदीवर स्थगिती देण्याची मागणी केली आहे. कंपनीची प्रतिमा यामुळे मलिन होत असल्याचा सिंघवी यांनी म्हटलं आहे.


वाचा : 'टिक टॉक'वर व्हि़डीओ बनवणं जीवावर बेतलं; दिल्लीतील तरुणाचा मृत्यू, तिघांना अटक