लखनौ : अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी काही दिवसांपूर्वीत भाजपची साथ सोडत काँग्रेसचा हात धरला होता. त्यानंतर आज त्यांची पत्नी पूनम सिन्हा यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव यांच्या उपस्थितीत पूनम सिन्हा यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला.


पूनम सिन्हा यांना समाजवादी पार्टीने लखनौ येथून उमेदवारीही जाहीर केली आहे. गुरुवारी त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी उद्या त्या डिंपल यांच्यासोबत एक पत्रकार परिषद घेणार आहेत. काँग्रेस लखनौमध्ये आपला उमेदवार उभा करणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.





भाजपने लखनौमधून राजनाथ सिंह यांना मैदानात उतरवलं आहे. येत्या 6 मे रोजी याठिकाणी मतदान पार पडणार आहे. याठिकाणची मतांचं समीकरण पाहिलं तर शत्रुघ्न सिन्हा यांच्या स्टारडम याचा फायदा पूनम सिन्हा यांना होऊ शकतो. तसेच पूनम स्वत: सिंधी असल्याचा फायदाही त्यांना याठिकाणी होऊ शकतो, कारण सिंधी समाजाची संख्या याठिकाणी मोठी आहे.


पूनम यांनी 1968 मध्ये 'जिगरी दोस्त' या सिनेमातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. पूनम यांनी 'मिस यंग इंडिया'चा खिताबही जिंकला होता.


काही दिवसांपूर्वीच भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांना पक्षाने पटना साहिबमधून उमेदवारी दिली आहे. याठिकाणी त्याचा सामना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी होणार आहे.