लखनऊ : मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी एका उमेदवाराने सख्ख्या भावाची हत्या केल्याचं समोर आलं आहे. उत्तरप्रदेशातल्या बुलंदशहर जिल्ह्यातल्या खुर्जा मतदारसंघातील रालोद उमेदवार मनोज गौतम यांनी भाऊ विनोद गौतम आणि त्यांचा मित्र सचिन गौतम यांची हत्या केल्याचं उघड झालं आहे.


भावाच्या मृत्यूने लोकांमध्ये सहानुभूती निर्माण होऊन निवडणुकीत आपला विजय होईल असं वाटल्याने मनोज गौतम यानं हे कृत्य केल्याची माहिती आहे. मंगळवारी सकाळी खुर्जा परिसरातील आंब्याच्या बागेत या दोघांचे गोळ्या झाडलेले मृतदेह सापडले.

पोलिसांनी तपासाला सुरुवात करताच संशयाची सुई मनोजकडेच जात होती. या हत्यांनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून पॅरामिलिट्री फोर्स तैनात करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा खोलवर तपास केला जातोय.