नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात जवळपास 35 वर्षे देशाची अर्थव्यवस्था माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याकडे होती. मात्र त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. त्यामुळे बाथरुममध्ये रेनकोट घालून अंघोळ कशी करावी, ते मनमोहन सिंहांकडून शिकावं, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार बरसले.


पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदारांनी गदारोळ करत सभागृह सोडलं. त्यामुळे काही काळासाठी मोदींना भाषण थांबवावं लागलं. त्यांनी नोटाबंदीवरही भाष्य केलं.

इंदिरा गांधींवर टीका

बसू यांनी सांगितलं होतं की, इंदिरा गांधी यांचं सरकार काळ्या पैशावरच टिकून आहे. त्यांचं राजकारण काळ्या पैशावर टिकून आहे. त्यामुळे नोटाबंदीची गरज असल्याचा रिपोर्ट लागू करण्यात आला नाही आणि दाबून ठेवण्यात आला, असा घणाघातही मोदींनी केला.

''नोटाबंदी ही जगभरातील अर्थतज्ञांसाठी केस स्टडी''

नोटाबंदीच्या निर्णयाला देशातील जनतेने पाठिंबा दिला. देशातील जनता अडचणींशी लढण्यासाठी त्रास सहन करायलाही तयार आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं मोदी म्हणाले. तसंच भारतातील नोटाबंदी ही जगभरातील अर्थतज्ज्ञांसाठी एक केस स्टडी आहे, कारण एवढा मोठा निर्णय जगभरात कुठेच झाला नव्हता, असंही त्यांनी सांगितलं.

''नोटाबंदीमुळे 40 दिवसांत 700 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण''

नोटाबंदीचा फटका खऱ्या अर्थाने बेईमानांना बसला असून इमानदार लोकांना ताकद मिळाली आहे. काळा पैसा, दहशतवादी आणि नक्षलवाद्यांना नोटाबंदीचा फटका बसला. नोटाबंदीनंतर 40 दिवसात 700 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं, अशी माहिती मोदींनी दिली.

''डिजिटल इंडियासाठी सकारात्मकता आवश्यक''

देशाचा प्रत्येक कानाकोपरा डिजिटल नाही, मात्र त्यासाठी सकारात्मक मानसिकता तयार करणं गरजेचं आहे. डिजिटल इंडिया करण्यासाठी घेतलेला निर्णय चूकिचा म्हटल्याने देश डिजिटल होणार नाही. त्यामुळे विरोधकांनी सहकार्य करावं, असं आवाहन मोदींनी केलं.

डिजिटल व्यवहारांचा फायदा लोकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. भीम अॅप विकसित करण्यासाठी एकही रुपया खर्च करावा लागला नाही, असं मोदींनी सांगितलं.

दरम्यान माझ्यावर किंवा सरकारवर आरोप होणं मी समजू शकतो, पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला राजकारणात का ओढलं जात आहे, असा सवालही मोदींनी केला.