Rice Price Hike : इंधनाच्या दरात वाढ झाल्याने गेल्या काही दिवसांपासून देशात महागाई वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहेत. खाद्यतेलासह गव्हाच्या किमती वाढल्यानंतर आता तांदळाच्या ( Rice) किंमतींमध्ये देखील वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या पाच दिवसांमध्ये तांदळाच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.  बांगलादेशने तांदळावरील आयात शुल्क आणि  आयात मालावरील जकात शुल्क 62.5 टक्क्यांवरून 25 टक्के केले आहे. 22 जून रोजी बांगलादेशने एक अधिसूचना जारी केली आणि 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत बिगर बासमती तांदूळ आयात करण्यास मान्यता दिली आहे. 


भारत गव्हानंतर तांदळाच्या निर्यातीवर बंदी येऊ शकते असा अंदाज वर्तविला जात आहे. भारताच्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या निर्णयाच्या भीतीने बांगलादेशने तांदूळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे बांगलादेशात अन्नधान्याचा तुटवडा आहे. भारताने यापूर्वीच गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे अडचणीत वाढ झाली असून, पुरामुळे बांगलादेशातील भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. 


बांगलादेशच्या या निर्णयानंतर पाच दिवसांत भारतीय बिगर बासमती तांदळाची किंमत 350 डॉलर प्रति टनवरून 360 डॉलरपर्यंत वाढली आहे. तांदळाच्या किमतीत दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहारमधून तांदूळ बांगलादेशला निर्यात केला जातो. बांगलादेशच्या या निर्णयानंतर या तीन राज्यांमध्येच तांदळाच्या किमतीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर इतर राज्यांमध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बांगलादेशने 2020-21 मध्ये 13.59 लाख टन तांदूळ आयात केला होता. आकडेवारीनुसार, 2021-22 मध्ये भारताने  6.11 अब्ज डॉलर किमतीचा बिगर बासमती तांदूळ निर्यात केला आहे. तर 2020-21 मध्ये 4.8 अब्ज डॉलर किमतीचा तांदूळ निर्यात झाला. तांदळाच्या जागतिक व्यापारात भारताचा वाटा 40 टक्के आहे. 


मगाहाईमुळे आधीच होरपळ झालेल्या सर्वसामान्यांना गव्हानंतर आता तांदूळ महागाईचा फटका बसणार आहे. पीठ, डाळी, खाद्यतेलापासून अनेक खाद्यपदार्थांच्या किमती आधीच वाढल्या आहेत. शिवाय इंधनाचे दर देखील चढेच आहेत. त्यातच आता तांदूळही महागल्याळे सामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. कोरोना महामारीच्या संटकातून थोडेफास सावरत असतानाच महागाईने आपले डोक वर काढले आहे. याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे.