Teacher suspended : एका केंद्रीय मंत्र्यांना प्रश्न विचारणं शिक्षकाला महागात पडलं आहे. केंद्रीय मंत्र्यांना प्रश्न विचारल्यामुळं शिक्षकावर निलंबनाची कारावाई केल्याची घटना घडली आहे. कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. केंद्रीय रसायने आणि खते तसेच अपारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांना एका शिक्षकाने खतांच्या टंचाई संदर्भात प्रश्न विचारला होता.  कुशाल पाटील असे त्या शिक्षकाचे नाव आहे. शिक्षक पाटील आणि केंद्रीय मंत्री खुबा यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर, कुशाल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


गेल्या हंगामात मला अनेक अडचणींचा सामना केला


दरम्यान, याबाबत शिक्षक कुशाल पाटील यांनी खुलासा देखील केला आहे. मी केंद्रीय मंत्र्यांना खतांच्या संदर्भात प्रश्न विचारला होता. त्यानंतर माझ्यावर ही निलंबनाची कारवाई झाल्याचे त्यांनी सांगितलं.  मी शेतकरी कुटुंबातून येतो. गेल्या हंगामात मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ज्यामुळं मी केंद्रीय मंत्र्याकडे याबाबत चौकशी केल्याचे शिक्षक कुशाल पाटील यांनी सांगितलं.









खतांच्या टंचाईबाबत मी काहीही करु शकत नाही : केंद्रीय मंत्री खुबा


कुशाल पाटील हे बिदार जिल्ह्यातील औराद तालुक्यातील हेडापुरा गावातील शिक्षक आहेत. त्यांच्यावर शिक्षण विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे. केंद्रीय मंत्र्यांची चौकशी केल्यानं त्यांना ही शिक्षा झाली आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये मंत्री खुबा यांनी खतांच्या टंचाईबाबत मी काहीही करु शकत नसल्याचे म्हटले आहे. हजारो कामगार आहेत जे खत पुरवठ्याची काळजी घेतील आणि शेतकऱ्यांकडे जातील असेही त्यांनी म्हटले आहे.


सध्या शेतकरी वर्ग पावसाकडे डोळे लावून बसला आहे. काही ठिकाणी पाऊस पडत आहे तर अद्याप काही ठिकाणी पावसानं दडी मारली आहे. पाऊस पडताच शेतकऱ्यांची खतांच्या खरेदीसाठी लगबग सुरु होते. मात्र, यंदा खतांची टंचाई निर्माण झाल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितलं. तसेच यंदा खतांच्या किंमतीत देखील मोठी वाढ झाली आहे. या सगळ्याच कंपन्यांनी यंदा खतांच्या दरात दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ केली आहे. दरम्यान, पोटॅश खतांच्या दरात सर्वाधित वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ते 930 रुपयांना मिळत होतं, यंदा मात्र किंमत 1700 रुपये झाली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.