नवी दिल्ली: महाराष्ट्रातील नगरपालिकांचे निकाल, ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाला मिळालेली जनतेची पावती आहे, असं केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.


जावडेकर यांनी नगरपालिका निकालांच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.

जावडेकर म्हणाले, "कधी कधी ऐतिहासिक निर्णयांना जनमताच्या चाचणीला सामोरं जावं लागतं. नगरपालिकांचे निकाल हे नोटाबंदीला विरोध करणाऱ्यांना चोख उत्तर आहे".

2011 मध्ये भाजपचे 8 नगराध्यक्ष होते, ते आता 52 वर पोहोचले आहेत. तर 2011 मध्ये भाजपचे 298 नगरसेवक होते, त्याची संख्या आता 980 वर पोहोचली आहे, असं जावडेकर यांनी सांगितलं.

नगरपालिका निकालात भाजप सुसाट


राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी भाजपनं मुसंडी मारली. तब्बल 31 नगरपालिका जिंकून भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जोरदार दणका दिला. तर 52 नगरपालिकेत भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला.

दुसरीकडे 20 नगरपालिका जिंकत काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांचेही 22 ठिकाणी थेट नगराध्यक्ष निवडून आले आहेत.

या निवडणुकांत सर्वात जास्त कुणाचं नुकसान झालं असेल तर ते राष्ट्रवादीचं. राष्ट्रवादी 17 नगरपालिकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

शिवसेना 16 नगरपालिकांसह शेवटच्या नंबरवर आहे. मात्र शिवसेनेचे 25 नगराध्यक्ष निवडून आलेत. त्यामुळे यात भाजपनंतर शिवसेनेचा क्रमांक येतोय. विशेष म्हणजे यावेळी स्थानिक आघाड्यांनाही बरं यश मिळालं आहे.