मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात  आरबीआयने रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केली आहे.  रिझर्व्ह बँकेची चलन धोरण आज जाहीर झालं. आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल  यांनी नवे दर जाहीर केले.

नव्या दरानुसार रेपो दर 6.50  टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांवर आला आहे. तर रिव्हर्स रेपो दर 6 टक्क्यांवरुन 5.75 टक्क्यांवर आला आहे.

आरबीआयच्या या निर्णयामुळे कर्जावरील व्याज कमी होऊन, कर्जदारांचा मासिक हफ्ता काहीसा कमी होणार आहे.

रेपो रेट म्हणजे काय?

रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर.  रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं.म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्रहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात.  तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.