नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. लस निर्मिती करणाऱ्या भारतातील दोन प्रमुख कंपन्याचा गौरव करण्यात आला आहे.  हैदराबादमधील स्वदेशी लस निर्माता कंपनी भारत बायोटेकचे कृष्णा ऐल्ला  आणि सुचित्रा ऐल्ला यांच्यासह सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सायरस पुनावाला यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  कोरोना लस निर्मितीमध्ये या दोन कंपन्याचे मोठे योगदान आहे. 


कोण आहे कृष्णा आणि सुचित्रा एल्ला?


भारत बायोटेक ही देशातील एकमेव स्वदेशी वॅक्सीन कोवॅक्सीन बनवणारी कंपनी आहे. या कंपनीचे संस्थापक, प्रमुख डॉ. कृष्णा एल्ला आणि त्यांची पत्नी डॉ. सुचित्रा एल्ला आहेत. डॉ. एल्ला हे यीस्ट मॉल्यूकुलर बायोलॉजिस्ट आहेत. तामिळनाडूच्या वेल्लूर जिल्ह्यात एल्ला परिवार शेती करायचे. रोटरीच्या फ्रीडम फ्रॉम हंगरची फेलोशिप मिळवून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. विस्कॉन्सिन-मेडिसिन विश्वविद्यालयात पीएचडी मिळवल्यानंतर एल्ला दक्षिण कैरोलिना येथील मेडिकल विद्यापीठात शिकवत होते. त्यानंतर ते भारतात परतले आणि पत्नी सुचित्रासोबत 1996 साली हैदराबाद येथे भारत बायोटेकची स्थापना केली.


 सिरम इन्स्टिट्यूटचा प्रवास


पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही व्हॅक्सीन बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. कोरोनावरील लसीची निर्मिती इथं मे महिन्यापासून सुरू आहे. सायरस पुनावाला यांनी पुण्यातील हडपसर भागात 1966 साली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. सायरस पूनावाला यांना शर्यतीच्या घोड्यांमध्ये रस होता. घोड्यांच्या रक्ताचा उपयोग अनेक प्रकारच्या लसी तयार करण्यासाठी केला जातो. त्यातूनच सायरस पूनावाला हे लस निर्मितीच्या व्यवसायात उतरले आणि सीरम इन्स्टिट्यूटचा प्रवास सुरू झाला. 


सीरम इन्स्टिट्यूटकडून पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते. आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवरती ज्या लसींचा उपयोग केला जातो त्यापैकी 65 टक्के लसी या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात. कोरोनावरील लस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटचा ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्रा झेनेका यांच्या सोबत करार झालाय.


संबंधित बातम्या