मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटलं की सर्वात आधी रिलायन्स समुहाचे मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचच नाव डोळ्यासमोर येतं. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार मुकेश अंबानी यांना मागे टाकत अदानी समुहाचे मालक गौतम अदानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मागील दोन दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात आलेल्या मंदीमुळे रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने परिणामी मुकेश अंबानींच्या कमाईतही मोठी घसरण झाली. ज्यामुळे गौतम अदानी यांनी कमाईच्या बाबतीत मुकेश अंबानींना मागे टाकत ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. याशिवाय जगातील श्रीमंत व्यक्तींमध्येही अदानी 11 व्या क्रमांकावर पोहोचले असून अंबानी सध्या 12 व्या क्रमांकावर आहेत.


फोर्ब्सच्या रिअल-टाइम नेट वर्थ डाटानुसार, सध्या गौतम अदानी यांची संपत्ती 90 अब्ज डॉलर म्हणजेच 6.72 लाख कोटी रुपये इतकी असून मुकेश अंबानी यांची संपत्ती 89.8 अब्ज डॉलर म्हणजेच 6.71 लाख कोटी रुपये इतकी आहे. मागील दोन दिवसांत भारतीय शेअर बाजारातील घडामोडींमुळे हा फरक पडल्याचं समोर येत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या (BSE) आकडेवारीवर नजर टाकल्यास, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स मागील दोन दिवसांत 155 रुपयांनी घसरले. ज्यामुळे अंबानींना याचा मोठा तोटा झाला असून केवळ दोन दिवसांत त्यांच्या संपत्तीत 52 हजार कोटी रुपयांनी घसरण झाली. दुसरीकडे अदानी यांच्या शेअर्सची किंमत मात्र वाढत आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून अदानी यांना होणाऱ्या फायद्यामुळे त्यांची एकूण संपत्ती रोज 6 हजार कोटींहून अधिकने वाढत आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha