Gallantry Awards : 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, केंद्र सरकारने मंगळवारी विविध केंद्रीय आणि राज्य पोलीस दलातील जवानांसाठी 189 शौर्य पदकांसह एकूण 939 सेवा पदके जाहीर केली. गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या शौर्य पदकांच्या यादीमध्ये शौर्यासाठी पोलीस पदक, विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक मिळालेल्या जवानांच्या नावांचा समावेश आहे.


लष्करातील सहा जवानांना शौर्य चक्र हा शांतता काळातील तिसरा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पाच जवानांना हा सन्मान मरणोत्तर मिळाला आहे. 17 मद्रास नायब सुभेदार सृजित एम यांना जुलै 2021 मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये शोध मोहिमेदरम्यान एका दहशतवाद्याला ठार केल्याबद्दल शौर्य चक्र (मरणोत्तर) प्रदान करण्यात आले.


 




प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP)च्या 18 जवानांना शौर्य पदकांसह विविध पोलीस सेवा पदके प्रदान करण्यात आली आहेत. तीन जवानांना शौर्यासाठी पोलीस पदक (PMG)प्रदान करण्यात आले आहे. विशेष सेवेसाठी तिघांना राष्ट्रपती पोलिस पदक आणि 12 जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलिस पदक जाहीर झाले आहे.


सहाय्यक कमांडंट अशोक कुमार, निरीक्षक सुरेश लाल आणि नीला सिंग यांच्या पथकाला फेब्रुवारी 2018 मध्ये छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील वामपंथी अतिरेकी प्रभावित भागात झालेल्या भीषण चकमकीत माओवाद्यांचा सामना करण्यासाठी पोलीस पदक देण्यात आले.


विशिष्ट सेवा पदक प्राप्तकर्त्यांमध्ये उपमहानिरीक्षक (डीआयजी) अजय पाल सिंग यांचा समावेश आहे. 1990 मध्ये अधिकारी म्हणून ते सामील झाले होते. 


ITBP च्या विविध प्रशिक्षण युनिट्समध्ये शिवाय अरुणाचल प्रदेश, लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषा (LAC) तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये बंडखोरीविरोधी कारवायांमध्ये काम केले आहे. डीआयजी रमाकांत शर्मा आणि जी. सी. उपाध्याय यांनाही विशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे.


सर्वाधिक 115 शौर्य पदके जम्मू-काश्मीर पोलिसांना देण्यात आली आहेत. त्याचबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दलाला (CRPF)30,छत्तीसगड पोलिसांना दहा, ओडिशा पोलिसांना नऊ आणि महाराष्ट्र पोलिसांना सात पदके मिळाली आहेत. त्याचप्रमाणे इंडो-तिबेट सीमा पोलीस (ITBP)आणि सशस्त्र सीमा बल (SSB)यांना प्रत्येकी तीन, तर सीमा सुरक्षा दलाला (BSF)दोन शौर्य पदके मिळाली. 88 जवानांना विशिष्ट सेवा पदक आणि 662 जवानांना गुणवंत सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha