Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या सुभेदार नीरज चोप्रा याला 'परम विशिष्ट सेवा पदका'ने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हे पदक देऊन त्याचा सन्मान होणार आहे. 


ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू आहे. त्याने टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 87.58 मीटर भाला फेकून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याला 'मेजर ध्यानचंद खेलरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.


राष्ट्रपती रामनाथ कोविंद 384 जवानांना शौर्य आणि इतर पुरस्कारांनी सन्मानित करणार आहेत. या पुरस्कारांमध्ये 12 शौर्य चक्र, 29 परम विशिष्ट सेवा पदके, 4 उत्तम युद्ध सेवा पदके, 53 अति विशिष्ट सेवा पदके आणि 13 युद्ध सेवा पदकांचा समावेश आहे.


नीरज चोप्रा सध्या भारतीय लष्करात नायब सुभेदार या पदावर आहे. तो मूळचा हरियाणातील पानिपत येथील आहे. 2016 च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजने 82.23 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले होते. यानंतर  2017 आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले. नीरजने 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत 86.47 मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले. 


परम विशिष्ट सेवा पदक (PVSM) हा भारताचा लष्करी पुरस्कार आहे. शांतता आणि सेवेच्या क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. प्रादेशिक सेना, सहाय्यक आणि राखीव दल, नर्सिंग अधिकारी आणि नर्सिंग सेवांमधील इतर सदस्यांसह भारतीय सशस्त्र दलातील सर्व श्रेणीतील कर्मचारी या पुरस्कारासाठी पात्र असतात. 


महत्वाच्या बातम्या