Republic Day Parade 2022 :  26 जानेवारी रोजी देशभरात 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधान लागू करण्यात आलं होतं. त्यामुळेच देशभरात 26 जानेवारी हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे (Republic Day Parade) आयोजन केले जाते. सैन्याच्या मार्चिंग तुकड्या, रणगाडे, तोफगोळे आणि बँड या परेडमध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी परेड ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने सुरु होणार आहे. गेल्या 75 वर्षात उशिराने परेड सुरु होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याचं कारण असं की, कोरोनाचे नियम आणि श्रद्धांजली सभेमुळे प्रजासत्ताक दिनाची परेड यावर्षी उशिराने सुरु होणार आहे.


घरबसल्या असा पाहा लाईव्ह परेड कार्यक्रम -
दरवर्षी राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे (Republic Day Parade) आयोजन केले जाते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घरातच राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे. घरी बसूनही तुम्ही राजपथावर सुरु असलेला परेड कार्यक्रम पाहू शकता. डिश टीव्ही, एअरटेल आणि टाटा स्कायसारख्या डीटीएच कनेक्शनद्वारे अथवा स्मार्टफोन आणि लॅपटॉपवरही ऑनलाईन कार्यक्रम पाहू शकता. याशिवाय राजपथावर सुरु असलेल्या परेडचं लाईव्ह प्रसार दूरदर्शनच्या यूट्यूब चॅनलवरही पाहाता येईल. 


परेडची वेळ काय?
यंदा परेड ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने सुरु होणार आहे. संपूर्ण परेड 90 मिनिटांची असते. दरवर्षी 26 जानेवारीला सकाळी ठिक 10 वाजता राजपथावर परेड सुरु होते. परंतु, कोरोनामुळे यावेळी ही परेड 10:30 वाजता सुरू होणार आहे. साधारण 8 किलोमीटर अंतराची ही परेड असणार आहे.  रायसीना हिलवरून सुरु झालेली परेड राजपथ, इंडिया गेटच्या दिशेने फिरून लाल किल्ल्यावर संपते. परेडच्या सुरुवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडिया गेटवर शहीद जवान ज्योती आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहणार आहेत.


थीम कोणती?
यंदाच्या परेडची थीम खास असणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची थीम स्वातंत्र्याचे 'अमृत महोत्सवी वर्ष' असल्यामुळे 'India@75' अशी ठेवण्यात आली आहे.