देशात विज्ञानाच्या नावाने सगळीकडे आलबेल असताना भारतातच शिक्षण पूर्ण करणाऱ्या आणि अगदीच तुटपुंजा साहित्याच्या मदतीने देशातच संशोधन करणाऱ्या सर सी.व्ही. रामन यांनी प्रकाशाच्या विकिरणावर संशोधन केले आणि जगाला दिशा देणाऱ्या 'रामन इफेक्ट'चा शोध लावला.
विज्ञान क्षेत्रातील मानाचा नोबेल पुरस्कार मिळवणारे महान वैज्ञानिक भारतरत्न सर सी.व्ही. रामन यांची आज जयंती. त्यांचे पूर्ण नाव सर चंद्रशेखर वेंकट रामन. त्यांनी प्रकाशाच्या विकिरणासंबंधी केलेल्या संशोधनाला नंतर त्यांच्याच नावाने ओळखले जाऊ लागले आणि त्या 'रामन इफेक्ट'ला 1930 सालचा मानाचा नोबेल पुरस्कार मिळाला.
रामन यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 साली तत्कालीन मद्रास प्रांतातील तिरुचिरापल्ली येथे झाला. अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी भौतिकशास्त्राच्या विषयातून मद्रास विद्यापीठाची प्रथम क्रमांकासह पदवी मिळवली आणि नंतर तिथूनच एमएससी ची पदवी प्राप्त केली. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी इंडियन फायनान्स सर्व्हिस जॉईन केली आणि कोलकात्याला असिस्टंट अकाउंट जनरल म्हणून काम सुरु केले. त्य़ावेळी त्यांचा इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिवेशन सायन्स या संशोधनासंबंधी काम करणाऱ्या संस्थेशी परिचय आला. त्यानंतर रामन यांच्यातील संशोधनाच्या वृत्तीने वेग घेतला. संशोधनाकडे कल असल्याने त्यांनी 1917 साली सरकारी नोकरीला रामराम केला आणि कोलकाता विद्यापीठात भौतिकशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून काम सुरु केले.
Indira Gandhi | इंदिरा गांधी : केवळ चौदा दिवसांत पाकिस्तानचे दोन तुकडे करणारी 'आयर्न लेडी'!
सर रामन यांनी प्रकाशाच्या विकिरणावर संशोधन सुरु केले. अशा प्रकारचे संशोधन करणारे ते आशियातील पहिलेच शास्त्रज्ञ होते. 1921 साली कोलकाता विद्यापीठातर्फे त्यांना उच्च शिक्षणासाठी लंडनला पाठवण्यात आले. तिथे त्यांनी भारतीय संगीत वाद्यांवर भौतिकशास्त्राच्या संदर्भातून संशोधन केलं आणि त्यावर काही शोधनिबंध सादर केले.
आकाश निळे का दिसते?
युरोपमधून भारतात परतत असताना त्याच्या संशोधनाला कलाटणी मिळाली. जहाजातून प्रवास करताना आकाशात सर्वत्र दिसणाऱ्या निळ्या रंगाने त्यांच्या मनात कुतुहूल निर्माण केले. जगात एवढे रंग असताना आकाश निळेच का दिसते हा प्रश्न त्यांना सतावत होता. त्यामुळे रामन यांनी प्रकाशाच्या विकिरणावर म्हणजे स्कॅटरिंगवर संशोधनाला सुरुवात केली.
जेव्हा प्रकाशाचे किरण एखाद्या अणूवर पडतात तेव्हा त्याचे विकिरण होते. म्हणजे तो प्रकाश त्या पदार्थातून बाहेर पडून इतरत्र पसरतो. वातावरणात वायूच्या कणांचा आणि अनेक सुक्ष्मकणांचा वावर असतो. त्या सुक्ष्मकणांवर प्रकाशाचे किरण पडल्यास कमी तरंगलांबी असणाऱ्या निळ्या रंगाचे स्कॅटरिंग मोठ्या प्रमाणावर होते आणि ते जेव्हा आपल्या डोळ्यांवर पडतात तेव्हा आपल्याला आकाश निळ्या रंगाचे भासते. प्रकाशाचे किरण मानवाच्या डोळ्यावर पडल्यानंतरच त्याला प्रकाशाची जाणीव होते. या नियमानुसार आपल्याला ज्या-ज्या वस्तुंचे रंग वेगवेगळे दिसतात त्यावेळी समजून जायचे की त्या वस्तूमधून संबंधित प्रकाशाच्या कमी तरंगलांबीचे जास्तीत जास्त विकिरण होत आहे.
डॉ होमी जहांगीर भाभा जयंती | भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम आणि 'न्युक्लिअर पॉवर'चे जनक
नेमकी हीच संकल्पना रामन इफेक्टच्या मुळाशी आहे. समुद्राच्या पाण्यामुळे आकाशाचा रंग निळा दिसत असेल असा अनेकांचा समज होता. यावर रामन यांनी बर्फ आणि पाणी यांच्या विकिरणाचे संशोधन केले आणि त्यांना आकाशाचा तसेच समुद्राच्या निळ्या रंगाचे गुढ उकलले.
काय आहे रामन इफेक्ट?
साध्या भाषेत सांगायचे तर एखाद्या पदार्थाच्या लहान कणावर प्रकाश किरण पडल्यास प्रकाशाचे विकिरण होताना त्याच्या तरंगलांबीत बदल होतो. सर सी.व्ही. रामन यांनी शोधलेल्या या 'रामन इफेक्ट'चा वापर आजही मोठ्या प्रमाणात केला जातो. रामन स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर करुन चांद्रयान-1 ने चंद्रावर पाणी असल्याचा पुरावा शोधण्यात आला होता.
28 फेब्रुवारी 1928 साली त्यांनी 'रामन इफेक्ट'चा शोध लावला आणि त्यांचा शोधनिबंध जगासमोर प्रकाशित केला. 1930 साली रामन यांच्या शोधाला जागतिक मान्यता मिळाली आणि त्यांना मानाचा नोबेल पुरस्कार मिळाला. रामन इफेक्टच्या शोधाच्या स्मरणार्थ भारतात 1987 सालापासून दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.
People's President डॉ.अब्दुल कलाम: पोखरणचा हिरो आणि खऱ्या अर्थाने 'फकीर'
नोबेल पुरस्कार मिळवणारे रामन हे पहिले आशियाई वैज्ञानिक होते. नोबेल पुरस्काराबरोबरच रामन यांना अनेक आंतरराष्ट्रीय मानसन्मान प्राप्त झाले. सन 1929मध्येल त्यांना ‘सर’ हा किताब प्राप्त झाला तर 1930 मध्ये रॉयल सोसायटीतर्फे दिले जाणारे हायग्रेझ पदकाचे ते मानकरी ठरले. 1954 साली ‘भारतरत्न’ हा भारतातील सर्वोच्च पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला.
जगदिश मिश्रांनी सर सी.व्ही. रामन यांच्या बायोग्राफीचे लेखन केले. ते लिहतात, "तो काळ असा होता की भारतातील अगदीच सुक्ष्म संख्येने तरुण विज्ञानाच्या अभ्यासाकडे वळत होते. अशा काळात रामन यांनी भारतातच शिक्षण घेतले आणि भारतात राहूच संशोधन केले. भारतात विज्ञानाबद्दल तितकी सजगता असती तर रामन हे गांधी आणि नेहरुंप्रमाणे भारताचे हिरो झाले असते. परंतु रामन यांनी स्वत: एकदा म्हटल्याप्रमाणे अविशिष्ट शोध लावणाऱ्या व्यक्तीवर एक किंवा अनेक देश आपला हक्क सांगतात. पण खऱ्या अर्थाने तो व्यक्ती संपूर्ण जगाचा असतो."
महत्वाच्या बातम्या:
Dr Kalam Jayanti : नावाड्याचा मुलगा ते वैज्ञानिक अन् देशाचे राष्ट्रपती, डॉ. अब्दुल कलामांचा प्रेरणादायी प्रवास
Om Puri Birth Anniversary : दमदार आवाज, जबरदस्त अभिनय, ओम पुरींचा वेगळाच अंदाज, जाणून घ्या त्यांच्याविषयी खास गोष्टी