मुंबई : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती. मिसाईल मॅन अशा  नावानं देखील त्यांची ओळख. एका नावाड्याचा मुलगा ते महान वैज्ञानिक आणि देशाचा राष्ट्रपती अशी डॉ. कलामांची ही वाटचाल थक्क करणारी आहे. डॉ. कलाम यांनी अॅरोनॉटिकल इंजिनीअर म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली असली तरी शाळेच्या दिवसात त्यांनी घराघरात पेपर टाकण्याचं काम केलं होतं. पेपर टाकण्यापासून देशाला शक्तिशाली देश बनवणं आणि त्यानंतर भारताचे राष्ट्रपती बनणं हे मोठं यश आहे. डॉ. कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला तर 27 जुलै 2015 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं.



देशाच्या दोन मोठ्या यंत्रणांचे प्रमुख
अब्दुल कलाम भारताच्या दोन मोठ्या यंत्रणांचे, अर्थात डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो)चे प्रमुख होते.
दोन्ही यंत्रणांमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केलं होतं.
भारताचं पहिलं रॉकेट एसएलव्ही-3 बनवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (पीएसएलव्ही) बनवण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.
त्याशिवाय भारताचं पहिलं क्षेपणास्त्र 'पृथ्वी' आणि त्यानंतर 'अग्नी' क्षेपणास्त्र बनवण्यातही डॉक्टर अब्दुल कलाम यांचं मोलाचं योगदान होतं.
अण्वस्त्र कार्यक्रमात भूमिका
भारताने 1998 मध्ये जी अण्वस्त्र चाचणी केली होती, त्यातही डॉ. कलाम यांची भूमिका होती. त्यावेळी ते डीआरडीओचे प्रमुख होते.
भारताला शक्तीशाली देश बनवण्यात अब्दुल कलाम यांची मोठी भूमिका आहे.
जगातील मोजकेच राष्ट्राध्यक्ष असे असतील जे उच्चविद्याविभूषित असतील. जागतिक राजकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. ते मानवतावादी होते.
इतकंच नाही तर ते मृत्यूदंडाच्याविरोधात होते, विशेषत: न्यायालयामार्फत देण्यात येणारी शिक्षा.

त्यांच्यासारखा दुसरा होणं अशक्य
कलाम हे त्यांच्यासारखे एकमेव होते. त्यांच्यासारखं दुसरं होणं अशक्य आहे. मुलांशी असलेलं त्यांचं नातं हे अवर्णनीय होतं.
ते मोठे वैज्ञानिक तर होतेच पण राष्ट्रपती बनल्यानंतरही त्यांना मुलांमध्ये रमत होते. ते मुलांसोबत लहान मुलांसारखंच बोलत असत.
डॉ. कलाम जन्माने मुस्लिम होते, पण त्यांचा जन्म हिंदूबहुल रामेश्वरम शहरात झाला होता.
कलाम यांचं 'अग्निपंख' हे पुस्तक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या भाषणांनी ते तरुणांमध्ये नवी उमेद जागी करत.
ज्यांचे विचार थोर असतील आणि विज्ञानात रस असेल, तेच असं कार्य करु शकतात.