मुंबई: देशातील चलन कलहाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कर्जदारांना दिलासा दिला आहे. कार,  घर तसेच अन्य कारणासाठी बँकाकडून १ कोटीपर्यंत कर्ज घेतलेल्या कर्जदारांना कर्ज परत फेडीसाठी आरबीआयने ६० दिवसांची अतिरिक्त मुदत वाढ दिली आहे.


रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे गृह कर्जासह शेतीसाठी कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना देखील दिलासा मिळला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेमुळे १ नोव्हेबर ते ३१ डिसेंबर या दरम्यान कर्जाचा हप्ता भरण्यास दिरंगाई झाल्याच्या कारणावरुन थकबाकीदाराचा शिक्का कर्जदारावर बसणार नाही.

देशातील आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना हा मोठा दिलासा दिला आहे.

नोटाबंदीनंतर इतर महत्त्वाचे निर्णय :

1. दोन हजार रुपयांपर्यंतच जुन्या नोटा बदलता येणार

दोन हजार रुपयांपर्यंतच जुन्या नोटा 30 डिसेंबरपर्यंत फक्त एकदाच बदलता येणार. याचा अर्थ दोन हजारापेक्षा जास्त रकमेच्या हजार-पाचशेच्या नोटा तुमच्याकडे असतील, तर त्या वाया जाणार असा होत नाही. तुम्ही हे पैसे बँकेत तुमच्या खात्यावर जमा करु शकता. त्यानंतर सोयीनुसार एटीएममधून ही रक्कम काढू शकता. वारंवार येणारे ग्राहक टाळण्यासाठी बोटाला शाई लावणार.

2. साडेचार हजार रुपयांच्या मर्यादेचा दुरुपयोग

साडेचार हजार रुपयांच्या मर्यादेचा दुरुपयोग असल्याचं निरीक्षण अर्थमंत्री अरुण जेटलींनी नोंदवलं. काळा पैसा पांढरा केला जात होता, त्यामुळे गरजूंना पैसे मिळत नव्हते आणि बँकांसमोरील रांगाही कमी होत नव्हत्या. मात्र नवीन व्यवस्थेमुळे याला चाप बसण्याची आशा आहे.

3. लग्नघरांना सरकारचा दिलासा

ज्यांच्या घरी लग्न आहे, त्यांना आता बँक खात्यातून अडीच लाख रुपये काढता येणार आहेत. केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. लग्नासाठी अडीच लाख रुपये काढता येणार आहे. मात्र यासाठी लग्नपत्रिका आणि स्वयंघोषणापत्र दाखवणं गरजेचं आहे. तसंच घरातील केवळ एकाच व्यक्तीच्या बँक खात्यातून ही रक्कम काढता येणार आहे.

4.  पेट्रोल पंपांवरही पैसे काढता येणार

देशातील काही पेट्रोल पंपावर 2 हजारांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. पहिल्या टप्प्यात अडीच हजार पेट्रोल पंपावर ही सुविधा सुरु करण्यात येईल. पेट्रोल पंपवर 2000 पर्यंत रक्कम काढता येणार आहे. आरबीआय आणि एसबीआय संयुक्तपणे ही मोहीम राबविणार आहे. ज्या पेट्रोल पंपावर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)च्या पीओएस (कार्ड स्वाईप मशीन) आहेत तिथेच ही सुविधा असणार आहे. सुरुवातीला 2500 पेट्रोल पंपावर पैसे काढता येणार आहे. 24 नोव्हेंबरपर्यंत पेट्रोल पंपावर 500 आणि 1000 च्या नोटा स्वीकारण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यामुळे एटीएम बाहेरच्या रांगा काही प्रमाणात कमी होतील.

5. राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुली 24 नोव्हेंबरपर्यंत बंद

24 नोव्हेंबर 2016 च्या मध्यरात्रीपर्यंत देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुली बंद करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली.