नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आपल्या जामनगर ऑईल रिफायनरी प्रकल्पामध्ये दररोज 1000 टनाहून अधिक मेडिकल ग्रेड ऑक्सिजनची निर्मिती करत आहे. कोविड -19 पासून सर्वाधिक नुकसान झालेल्या राज्यांना हे ऑक्सिजन विनाशुल्क दिले जात आहे. रिलायन्स आज भारताच्या मेडिकल ग्रेडच्या सुमारे 11 टक्के ऑक्सिजनचे उत्पादन करत आहे आणि दर दहा रुग्णांपैकी एका रुग्णाला हे ऑक्सिजन देण्यात येत आहे.


मुकेश अंबानी स्वतः रिलायन्सच्या 'मिशन ऑक्सिजन'वर नजर ठेवत आहेत. त्यांच्या नेतृत्वात रिलायन्स दुहेरी रणनीतीवर काम करत आहे. पहिले म्हणजे जामनगरमधील रिलायन्सची रिफायनरी प्रक्रिया बदलून अधिक जीवनरक्षक ऑक्सिजन तयार करुन जास्तीत जास्त रुग्णांचे प्राण वाचवणे आणि दुसरं म्हणजे लोडिंग तसेच वाहतूक क्षमतांमध्ये वाढ करून जेणेकरून गरजू राज्यांमध्ये सुरक्षितपणे ऑक्सिजनची वाहतूक करता येऊ शकेल.


रिलायन्सची जामनगर रिफायनरी कच्च्या तेलापासून डिझेल, पेट्रोल आणि जेट इंधनासारखी उत्पादने तयार करते. येथे मेडिकल-ग्रेड ऑक्सिजन तयार केले जात नाही. परंतु कोरोना व्हायरसच्या संसर्गात वाढ झाल्यानंतर ऑक्सिजनची मागणी झपाट्याने वाढली. ही मागणी लक्षात घेऊन याठिकाणी रिलायन्सने मेडिकल ग्रेड ऑक्सिजनची निर्मिती करण्यास सक्षम असलेली अशी यंत्रणा निर्माण केली आहे.




विक्रमी वेळेत 0 ते 1000 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती


रिलायन्सने अगदी थोड्या वेळात मेडिकल ग्रेड ऑक्सिजनचे उत्पादन शून्यावरून 1000 मे. टन केले आहे. मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मितीमुळे दररोज सरासरी 1 लाख रुग्ण श्वास घेऊ शकतात. रिलायन्सने एप्रिल महिन्यात 15,000 मेट्रिक टन आणि महामारी सुरू झाल्यापासून 55,000 मेट्रिक टन मेडिकल ग्रेड ऑक्सिजनचा मोफत  पुरवठा केला आहे


परदेशातून 24 ऑक्सिजन टँकर एअरलिफ्ट
 
ऑक्सिजनचे लोडिंग आणि पुरवठा हा देशातील एक मोठा अडथळा बनला आहे. रिलायन्सच्या अभियंत्यांनी नायट्रोजन टँकरला ऑक्सिजन टँकरमध्ये रूपांतरित करून यावर तोडगा काढला आहे. याव्यतिरिक्त, रिलायन्सने ऑक्सिजन पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी सौदी अरेबिया, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स आणि थायलंडमधील 24 ऑक्सिजन टँकर विमानाने आणले आहेत. यामुळे देशातील लिक्विड ऑक्सिजनची एकूण वाहतूक क्षमता वाढून 500 मे. टन झाली आहे. टँकर एअरलिफ्ट करण्यात भारतीय हवाई दलाला मोठी साथ मिळाली. रिलायन्सचे पार्टनर्स सौदी अरामको आणि बीपी यांनी ऑक्सिजन टँकरच्या खरेदीसाठी सहकार्य केले. रिलायन्सने भारतीय हवाई दल आणि त्याच्या सहाय्यक कंपन्यांचे आभार मानले आहेत.


रिलायन्सच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करताना रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी म्हटलं की, "जेव्हा भारत कोविड -19 च्या दुसर्‍या लाटेशी सामना करत आहे त्यावेळी माझ्यासाठी आणि रिलायन्समधील आम्हा सर्वांसाठी नागरिकांचे प्राण वाचवण्यापेक्षा महत्त्वाचं दुसरं काही नाही. भारतात मेडिकल ग्रेड ऑक्सिजनचं उत्पादन आणि वाहतूक क्षमता वाढवण्याची तातडीने गरज आहे. देशभक्तीच्या भावनेने हे नवे आव्हान पेलण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या जामनगरमधील माझ्या अभियंत्यांचा मला अभिमान आहे. रिलायन्स कुटुंबातील तरुणांनी दाखवलेल्या दृढनिश्चयाचा मला अभिमान आहे. भारताला ज्यावेळी सर्वाज जास्त गरज होती त्यावेळी हे सर्व जण उभे राहिले."
 
रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी म्हटलं की , "आपला भारत देश अभूतपूर्व संकटातून जात आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यामातून आम्ही सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक जीवन मौल्यवान आहे. आमची जामनगर रिफायनरी आणि प्रकल्पात रातोरात बदल करण्यात आले. जेणेकरुन भारतात मेडिकल ग्रेड लिक्विड ऑक्सिजन तयार होईल. आमची प्रार्थना देशवासीय आणि महिलांसोबत आहेत. एकत्रितपणे, आपण या कठीण काळावर मात करू."