नवी दिल्ली : कोरोना संकट आणि त्यात लसीचा तुटवडा या संकटाच्या काळात देशासाठी चांगली बातमी आली आहे. रशियन लस स्पुटनिक V लसीची पहिली खेप शनिवारी हैदराबादला पोहोचली आहे. रशियावरुन खास विमानाने स्पुटनिकची ही लस हैदराबादला दाखल झाली आहे. कोरोना व्हायरसविरूद्ध ही लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे. या लसीचे डोस उपलब्ध झाल्याने लसीकरणाला गती मिळणार आहे. लसीकरणाला गती देण्यासाठीच केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी स्पुटनिक V लसीला आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे.


काही दिवसापूर्वी 'स्पुटनिक व्ही' लसीला भारताच्या DCGI ची मंजुरी मिळाली होती. आणि स्पुतनिक V वापराला मान्यता देणारा भारत हा 62 वा देश ठरला. 'रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड' या लसीच्या वितरणासाठी असलेल्या कंपनीने भारतात डॉक्टर रेड्डीज लॅब सोबत करार केला आहे. पहिल्या खेपेत दीड ते 2 लाख डोस सध्या भारतात आल्याची माहिती मिळतेय. मात्र मे महिन्याच्या शेवटपर्यंत 30 लाख डोस भारतात येण्याची शक्यता आहे. 


रशियाची स्पुटनिक V ही जगातील पहिली लस आहे. 11 ऑगस्ट 2020 रोजी रशियाने या लसीची नोंदणी केली होती. ही लस गॅमलेया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ एपिडोमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने विकसित केली आहे.






लसीकरण मोहिमेची गती वाढणार


भारतात, आजपासून (1 मे) 18 ते 44 वर्षे वयोगटातील तिसर्‍या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात मोठ्या संख्येने लोकांनी नोंदणी केली आहे. मात्र लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण मोहिमेला बऱ्याच ठिकाणी खंड पडला. तरी रशियन लस स्पुटनिक V भारतात दाखल झाल्याने लसीकरण कार्यक्रम वेगाने सुरु होण्याची अपेक्षा आहे.


आजपासून देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे प्रत्येकजण लस घेण्यास सक्षम असेल. परंतु, लस नसल्यामुळे सध्या अनेक राज्यात तिसर्‍या टप्प्यातील लसीकरण सुरू झाले नाही. सध्या देशात दोन लसीचा वापर सुरु आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि ऑक्सफोर्ड अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड या लसी लोकांना दिल्या जात आहे. देशात कोरोना लसीच्या 14 कोटीहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.