नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनींपैकी एक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांना लसींसाठी मोठ्या प्रमाणात फोन येत आहेत. तसेच काही जणांकडून धमक्याही दिल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मला येणारे फोन कॉल्स अत्यंत वाईट बाब आहे. फोन करणाऱ्यांमध्ये प्रतिष्ठित लोकांचा समावेश देखील आहे, असं अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे. 


सीरम इन्स्टिट्युटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी ब्रिटनच्या द टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, आम्हालाच सर्वात अगोदर लस मिळावी या मागणीसाठी गेल्या काही दिवसात त्यांना देशातल्या अनेक पॉवरफुल लोकांचे सतत फोन येत आहेत. त्यात काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. अनेक उद्योग समूहांचे प्रमुख आहेत  आणि इतर श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे. त्या फोन कॉल्सचं स्वरुप कधी कधी धमक्यांचंही असतं. मार्टिन फ्लेचर यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सीरमतर्फे लवकरच देशआबाहेर लशीची निर्मिती कऱण्याचे नियोजन असल्याचीही माहिती दिली. अदर पुनावाला हे सध्या ब्रिटनमध्ये आहेत.


केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे सीईओ अदर पूनावाला यांना 'Y' श्रेणीची सुरक्षा दिली आहे. 16 एप्रिल रोजी सीरम इन्स्टिट्युटमधील शासकीय आणि नियमन कार्याचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहून अदर पूनावाला संरक्षण देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.


प्रकाश कुमार सिंह यांनी आपल्या पत्रात म्हटलं की, कोविड 19 लस पुरवण्याबाबत अदर पूनावाला यांना अनेकांकडून धमक्या मिळत आहेत. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकारच्या खांद्याला खांदा लावून कोविड -19 साथीच्या विरोधात लढा देत आहोत. Y श्रेणी सुरक्षा अंतर्गत केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) सशस्त्र कमांडो पूनावाला यांच्यासोबत नेहमी राहतील. देशात विविध ठिकाणी प्रवास करतानाही ही सुरक्षा त्यांना दिली जाणार आहे. 'Y' श्रेणी सुरक्षा अंतर्गत पूनावाला यांच्यासोबत जवळपास 4-5 सशस्त्र कमांडो असतील.