भोपाळ: लग्न करूनही जबाबदाऱ्या पार न पाडणं आणि शारीरिक संबंधांना नकार देणे ही मानसिक क्रूरता आहे आणि घटस्फोटासाठी ते वैध कारण आहे असा महत्वपूर्ण निकाल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने (Madhya Pradesh High Court) दिला आहे. न्यायमूर्ती शील नागू आणि न्यायमूर्ती विनय सराफ यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. सन 2006 मध्ये झालेल्या एका भांडणानंतर एका व्यक्तीच्या पत्नीने पुढच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास आणि शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. त्यामुळे न्यायालयाने त्या व्यक्तीला घटस्फोट मंजूर केला.


मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, लग्न केल्यानंतरही आपल्या जबाबदाऱ्या पार न पाडणे आणि शारीरिक संबंधांना नकार देणे म्हणजे मानसिक क्रूरतेसारखे आहे. आपलं दुसऱ्याच व्यक्तीवर प्रेम असून बळजबरीने लग्न लावून दिल्याचं कारण सांगत एका पत्नीने 2006 सालापासून त्याच्या पतीपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पतीने घटस्फोट मिळावा अशी करत उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. 


दुसऱ्यावर प्रेम असल्याचं सांगितलं


या प्रकरणातील महिलेने तिच्या पतीला सांगितले की तिचे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे. तसेच तिने आपल्या पतीला प्रियकराशी ओळख करून देण्याची विनंती केली. त्यानंतर कामानिमित्त अमेरिकेला गेल्याचे याचिकाकर्त्याने सांगितले. त्यानंतर त्याची पत्नी तिच्या पालकांच्या घरी गेली आणि परत आलीच नाही.


पतीने 2011 मध्ये भोपाळ येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला, परंतु न्यायालयाने 2014 मध्ये तो फेटाळला. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आता उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, अनेक प्रसंगी महिलेने लग्न सुरू ठेवण्यास आणि पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. शारीरिक अपंगत्व किंवा वैध कारणाशिवाय दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवण्यास एकतर्फी नकार देणे म्हणजे मानसिक क्रूरता असू शकतं असं निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं. उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश अवैध ठरवून त्या पतीला घटस्फोट देण्याचा आदेश दिला. 


उच्च न्यायालयाने सांगितले की, याचिकाकर्त्याने लग्न केल्यानंतर तो अमेरिकेला जाणार आहे हे त्या मुलीला माहिती होतं. त्या दोघांच्या समंतीनेच हा विवाह झाला होता. परंतु लग्न झाल्यानंतर याचिकाकर्त्याच्या पत्नीने नंतरच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास नकार दिल्या आणि शारीरिक संबंधासही नकार दिला. तिचे हे कृत्य नक्कीच मानसिक क्रूरता आहे.  


ही बातमी वाचा: