मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये (Bharat Jodo Nyay Yatra) सहभागी होण्याचं निमंत्रण वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar)  मिळालं आहे. प्रकाश आंबेडकरांनी हे निमंत्रण स्वीकारलं असून इंडिया आघाडीमधील समावेशाचा निर्णय घ्यावा अशी मागणीही केली आहे. इंडिया किंवा महाविकास आघाडीचा घटक नसताना भारत जोडो यात्रेमध्ये सामील होणं आमच्यासाठी अडचणीचं ठरू शकेल असं प्रकाश आंबेडकरांनी मत व्यक्त केलं आहे. 


गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष हा विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये सामील होणार अशी चर्चा आहे. त्याबाबत दिल्लीमध्ये बैठक झाली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून मान्यता आहे. पण अंतिम निर्णय मात्र अद्याप झालेला नाही. त्याच वेळी आता प्रकाश आंबेडकरांना आता काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचं आमंत्रण मिळालं आहे. 


काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? 


डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली आहे. ते म्हणतात की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सामील होण्यासाठी मला निमंत्रण मिळालं आहे. मी सशर्त आमंत्रण स्वीकारलं आहे.  वंचितला अद्याप INDIA आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे या यात्रेत सामील होणं हे काहीसं अडचणीचं ठरू शकेल. 


इंडिया आणि महाविकास आघाडीमध्ये सामील न होता भारत जोडो न्याय यात्रेत सामील झाल्यामुळे युतीची अटकळ बांधली जाईल, जी अद्याप पूर्ण झालेली नाही. म्हणून मी राहुल गांधींना विनंती केली आहे की त्यांनी वंचितला इंडिया आणि महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याचं निमंत्रण पाठवावे. 


 






वंचित बहुजन आघाडीने मागील चार महिन्यात तीन वेळा काँग्रेस हायकमांडला पत्र लिहलं आहे. जर कॉंग्रेस पक्षाने इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला निमंत्रित केले, तर राज्यात भाजपाला निवडणूक जिंकणे अवघड होईल.


ही बातमी वाचा: