आठवलेंच्या केंद्रीय मंत्रिपदामागील भाजपची गणितं काय?
एबीपी माझा वेब टीम | 05 Jul 2016 12:05 PM (IST)
नवी दिल्ली : मोदी सरकारचा पहिला मोठा विस्तार अखेर पार पडलाय. 10 राज्यातल्या 19 मंत्र्यांनी आज शपथ घेतली. पण नव्या मंत्र्यांवर नजर टाकली तर यात कुणी पालिटिकल हेवीवेट फारसे दिसत नाहीत. पण विस्तारात सर्वात प्रकर्षानं जाणवणारी गोष्ट आहे ती म्हणजे मोदींचं सोशल इंजिनीयरिंग. त्यामुळेच आजवर महाराष्ट्रात जी गोष्ट अनेक लोक सिरीयसली घ्यायला तयार नव्हते ती प्रत्यक्षात उतरलीय. आठवलेंना मंत्रिपदं देण्यामागची नेमकी काय गणितं आहेत. जाणून घेऊयात या विशेष रिपोर्टमधून. जे दृश्य खरं तर आघाडी सरकारच्या काळात दिसणार होतं, ते इतक्या वर्षानंतर मोदी सरकारमध्ये दिसलं. गेली दहा वर्षे ज्या मंत्रिपदाकडे आठवलेंचे डोळे लागलेले होते, ते स्वप्न अखेर पूर्ण झाले. भावनोत्कट झाल्यानंच की काय या महत्वपूर्ण क्षणाला ते असे गडबडले. आठवलेंच्या या गडबडण्यावरुन महाराष्ट्रात लगेच अनेक विनोद, कुचेष्टांना सुरुवात झाली. पण त्यावर आठवलेंनी खुलासाही केला आहे. सुरुवातीला त्यांनी आपल्याला डोळ्याचा प्रॉब्लेम असल्याचं म्हटलं. त्यानंतर त्यांनी चारोळीत मी गडबडलो नाही, आता काँग्रेस-राष्ट्रवादी गडबडेल असं म्हटलं. अठरा खासदार असलेल्या शिवसेनेला जो आदर मिळाला नाही, तो एकही आमदार- खासदार नसतानाही आठवलेंना मिळाला. याचं एकमेव कारण म्हणजे मोदींचं सोशल इंजीनियरिंग. यूपीच्या निवडणुकीत प्रो-दलित अशी इमेज दाखवायलाही चांगलं, शिवाय मुंबई महापालिकेचं जे घमासान रंगणार आहे त्यातही आठवलेंची साथ मोलाची. अशी गणितं करुन आठवलेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय...