नवी दिल्लीः कांग्रेसची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीची धूरा प्रियंका गांधी सांभाळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. प्रियंका गांधी या यूपीमधील दीडशे ते दोनशे मतदारसंघांमध्ये प्रचार करणार असल्याचं नियोजन काँग्रेसने केलं असल्याचंही बोललं जात आहे.

 

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी परदेश दौऱ्यावरुन नुकतेच परत आले आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांच्यात प्रियंका गांधी यांच्याकडं यूपीची सूत्र देण्याबाबत प्रदीर्घ चर्चा झाली. प्रियंका गांधी यांनी देखील या चर्चेनंतर होकार दिला असल्याचं बोललं जात आहे. येत्या 48 तासांत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

 

'प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ'

प्रियंका गांधी यांना राजकारणात सक्रीयपणे आणण्याची मागणी सर्वच काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. काँग्रेसचे रणनितीकार प्रशांत किशोर यांनी देखील प्रियंका यांना यूपी विधानसभा निवडणूकीसाठी मुख्य प्रचारकाच्या भूमिकेत आणण्याची मागणी केली आहे.

 

यूपीतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी तर प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ, अशी मागणी केली आहे. त्यामुळे प्रियंका यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.