93 वर्षीय वाजपेयींना विविध आजारांनी ग्रासलं होतं. त्यांना किडनी संसर्ग तर होताच, शिवाय मूत्रसंसर्ग, छातीदुखी, मधुमेह यासारख्या आजारांनी वाजपेयी त्रस्त होते.
वाजपेयींनी तीन वेळा भारताचं पंतप्रधानपद भूषवलं. जिंदादिल राजकारणी, हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्त्ववादी म्हणून अटल बिहारी वाजपेयी परिचीत होते. हिंदुत्ववादी भूमिकेकडे झुकले असूनही वाजपेयींनी नेहमीच धर्मनिरपेक्षतेची बाजू घेतली. त्यामुळेच त्यांना 'राईट मॅन इन राँग पार्टी' असं म्हटलं गेलं.
राष्ट्रपतींपासून पंतप्रधानांनी अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली, मी नि:शब्द आणि शून्यात आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी ट्विटरद्वारे दिली आहे. मोदी म्हणाले की....
"मी नि:शब्द आहे, शून्यात आहे. पण मनात भावनांचा डोंब उसळला आहे. आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान असलेले अटलजी आपल्यात राहिले नाहीत. त्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण देशाला अर्पण केला होता. त्यांचं जाणं म्हणजे एका युगाचा अंत आहे."
"पण ते आपल्याला सांगून गेले आहे... "मौत की उमर क्या है? दो पल भी नहीं, ज़िन्दगी सिलसिला, आज कल की नहीं मैं जी भर जिया, मैं मन से मरुं, लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरुं?"
"अटलजी आज आपल्यात राहिले नाहीत, पण त्यांची प्रेरणा, त्यांचं मार्गदर्शन, प्रत्येक भारतीय, प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यासाठी कायम मिळत राहिल. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि हे दु:ख सहन करण्याचं बळ त्यांच्या प्रत्येक जवळच्या व्यक्तीला देवो. ओम शांती!"
विलक्षण नेतृत्त्व : राष्ट्रपती
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनावर आपल्या भावना व्यक्त केल्या. ट्विटरवर त्यांनी लिहिलं आहे की, "माजी पंतप्रधान आणि भारतीय राजकारणातील महान व्यक्ती अटल बिहारी वाजपेयी निधनाने मला अतिशय दु:ख झालं. विलक्षण नेतृत्त्व, दूरदृष्टी आणि अद्भूत भाषण हे त्यांना एक मोठं व्यक्तिमत्त्व बनवतं. त्यांचं विराट आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व आमच्या आठवणीत कायम राहिल."
शिवसेनाप्रमुखानंतर आणखी एक भीष्म पितामह गमावला : उद्धव ठाकरे
"अटलजींच्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळे 'एनडीए' मजबूत राहिली. शिवसेनाप्रमुखांनंतर आम्ही आणखी एक भीष्म पितामह गमावला, पण ते सदैव आमच्या हृदयात राहतील. अटलजी अमर आहेत!," अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली.
भारताने महान सुपुत्र गमावला : राहुल गांधी
"भारताने आज आपला महान सुपुत्र गमावला. माजी पंतप्रधान, भारतरत्न वाजपेयी यांना लाखो लोकांचं प्रेम मिळालं होतं. त्यांचं कुटुंब आणि समर्थकांप्रती मी सांत्वन व्यक्त करतो. ते कायम आमच्या स्मरणात राहतील," असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वाजपेयींना श्रद्धांजली वाहताना म्हटलं आहे.
आमच्यासाठी दु:खद क्षण : राजनाथ सिंह
अटलजी यांचं निधन हा आमच्यासाठी अतिशय दु:खद क्षण आहे. वाजपेयींच्या निधनाने माझं वैयक्तिक नुकसान झालं. भारताने निष्ठावंत मुत्सद्दी आणि चतुर नेतृत्त्व गमावलं, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. तसंच थोड्याच वेळात वाजपेयींचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नेलं जाईल, जिथे लोक त्यांचं अंत्यदर्शन घेऊ शकतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
वाजपेयींचं निधन मनाला वेदना देणारं : मुख्यमंत्री
अटलबिहारी वाजपेयी...केवळ कुण्या एका व्यक्तीचे हे नाव नाही, तर ते नाव आहे एका महासागराचे...नावाप्रमाणेच अटल, अढळ, अचल...ज्यांच्याकडे पाहून राष्ट्रभक्ती या शब्दाचा अर्थ कळतो, ज्यांच्याकडे पाहून राष्ट्राच्या सर्वांगिण विकासाच्या स्वप्नपूर्तीची अभिलाषा जागी होते, आदर्श, सत्यवचनी, कर्तव्य कठोर पण, तितक्याच निर्मळ मनाचा थोर नेता, आधुनिक युगातील एक महापुरुषाचे आज आपल्यातून असे निघून जाणे, मनाला अतिशय अतिशय वेदना देणारे आहे. आमचे थोरनेते, राष्ट्रपुरुष श्रद्धेय अटलजी यांचे आपल्यातून निघून जाणे, ही माझी वैयक्तिक हानी आहे! ज्या नेत्यांकडे पाहून आपण राजकारणाची पायरी चढलो, त्या आदर्शापैकी श्रद्धेय अटलजी एक! लोकशाहीत विविध आयुधं वापरुन समाजाची आणि समाजातील शेवटच्या घटकाची सेवा कशी करता येऊ शकते, याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय आयुष्यातून घालून दिला. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
माझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला : लता मंगेशकर
अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर मला असं वाटलं की माझ्या डोक्यावर जणू काही डोंगरच कोसळला आहे. कारण ते वडिलांच्या जागी मानत होते आणि मी त्यांना मुलीसारखीच होते. ते मला एवढे प्रिय होते की, मी त्यांना दद्दा म्हणायचे. माझ्या वडिलांचं निधन झालं त्यावेळी जेवढं दु:ख झालं होतं, तेवढंच दु:ख मला आज झालं. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, अशा शब्दात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
देशाने महान नेता गमावला : मनोहर पर्रिकर
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनीही अटल बिहारी वाजपेय यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. "प्रिय अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे मला अतिशय दु:ख झालं आहे. भारताने महान नेता गमावला. ते जनतेचे आणि दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी आपलं अख्खं आयुष्य देश आणि जनतेसाठी अर्पित केलं होतं."
राष्ट्रसूर्याचा अस्त : अजित पवार
अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने राष्ट्रसूर्याचा अस्त झाला. उच्च नैतिकमूल्य आणि वैचारिक अधिष्ठान असलेलं राष्ट्रीय नेतृत्त्व आपण गमावलं आहे, अशी प्रतिक्रि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे.
वाजपेयी 65 वर्ष माझे जवळचे मित्र होते : लालकृष्ण अडवाणी
"या दु:खद क्षणाला माझ्याकडे शब्द नाहीत. एका सहकाऱ्यापेक्षा अटल बिहारी वाजपेयी 65 वर्ष माझे सर्वात जवळचे मित्र होते," अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी श्रद्धांजली वाहिली
बहुआयामी लोकनेता हरपला : छगन भुजबळ
"एक कुशाग्र, बुद्धिमान, समर्पित लोकनेता तसंच निस्वार्थी, निस्पृह आणि निष्णात राजकारणी, ख्यातनाम कवी, साहित्यिक, पत्रकार आणि खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे लोकशाहीची महती लक्षात घेऊन चालणारा महान नेता आज कायमचा हरपला," अशी शोक भावना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
तेजस्वी ताऱ्याचा अस्त : सुमित्रा महाजन
राष्ट्रनायक, भारतरत्न, श्री अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन. मी स्तब्ध आहे. निशब्द आहे. वाजपेयी आपल्यात राहिले नाही, यावर मला विश्वास बसत नाही. मी साश्रू नयांनी त्यांना श्रद्धांजली वाहते. ॐ शांती!
भारतीय राजकारणाच्या अवकाशातील तेजस्वी ताऱ्याचा अस्त झाला. भारतरत्नच नाही तर भारतमातेच्या मुकुटाचा दैदिप्यमान रत्न, ज्याने साहित्य असो वा राजकीय, सामाजिक सौहार्दाची गोष्ट असो किंवा राजकीय संयम आणि सभी पक्षांच्या नेत्यांना आपल्या विनम्र भाषेने प्रभावित करुन एकत्र आणण्याचं अनोखं उदाहरण समोर ठेवलं, अशी प्रतिक्रिया लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ट्विटरवर व्यक्त केली.
अटलजी कधीच संदर्भहीन झाले नाहीत : राज ठाकरे
स्वातंत्र्यपूर्व असो वा स्वातंत्र्योत्तर भारत ते नव्या सहस्रकातील भारत अशा दीर्घ पटलावर, अर्धशतकाहून अधिक कालावधीची, अटलजींची राजकीय कारकीर्द होती. पण एवढ्या दीर्घ कालावधीत अटलजी कधीच संदर्भहीन झाले नाहीत. उलट प्रत्येक सरत्या दशतात आणि बदलत्या पिढीत त्यांची गरज जास्तच भासू लागली. म्हणूनच नव्या सहस्रकात प्रवेश करताना देशाचं नेतृत्त्व अटलजींच्या हाती आलं, ह्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.