मुंबई: रद्द झालेल्या हजार-पाचशेच्या नोटांची नेमकी संख्या आणि मूल्य आहे तरी किती? नोटाबंदीला एक महिन्यापेक्षा जास्त अवधी लोटल्यानंतर आता प्रश्न उपस्थित करावा लागतोय. याचं कारण आहे, रिझर्व बँकेने अनिल गलगली या मुंबईच्या आरटीआय कार्यकर्त्याला माहिती अधिकारांतर्गत दिलेलं उत्तर.

RTI मधून बाहेर आलेली माहिती

  • ज्या दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली, त्यावेळी भारतीय रिजर्व बँकेकडे, 500 रुपयाची एकही नवी नोट नव्हती.

  • नव्या 2000 रुपयांच्या 24 हजार 732 कोटी नोटा ज्याची किंमत 4,94,640 कोटी होती.

  • याउलट ज्यादिवशी म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी नोटबंदी केली, त्यावेळी आरबीआयकडे 10, 20, 50, 100, 500 आणि 1000 रुपये मूल्यांच्या एकूण चलनाची संख्या 12,42,300.1 कोटी होती. तर त्याची एकूण किंमत 23,93,753.39 कोटी होती.

  • यात 500 आणि 1000 मूल्यांच्या चलनाची संख्या 3,18,919.2 कोटी होती, ज्याची एकूण किंमत  20,51,166.52 कोटी होती.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला तेव्हा, चलनात 15.44 लाख कोटी रूपयांच्या हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटा असल्याचं सांगण्यात आलं होतं. देशाच्या अर्थव्यवस्थेत असलेल्या एकूण चलनाच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल 86 टक्के होतं. त्यामुळेच बँकांवर प्रचंड ताण आला आणि अर्थव्यवस्था कोलमडल्यासारखी स्थिती झाली.

मात्र आता रिझर्व बँकेनेच माहिती अधिकार कायद्या अंतर्गत दिलेल्या माहितीनुसार 8 नोव्हेंबरपर्यंत 20.51 लाख कोटी मूल्यांच्या नोटा चलनात होत्या. त्यापैकी लोकांनी आतापर्यंत बँकामध्ये फक्त 14 लाख कोटी रूपये जमा केले आहेत.

रिझर्व बँकेने जारी केलेल्या जुन्या आकडेवारीनुसार, हजार-पाचशेच्या रद्द झालेल्या नोटाचं मूल्य 15.44 लाख कोटी होतं, त्यापैकी 14 लाख कोटी बँकेकडे परत आले. आता फक्त 1.44 लाख कोटी रूपयांची प्रतिक्षा आहे. त्यामुळे ते परत आले की नोटाबंदीची प्रक्रिया पूर्ण होणार. त्यासाठी सरकारने 30 डिसेंबरपर्यंतची मुदतही दिलीय. पण ती मुदत पूर्ण होण्यापूर्वीच सरकारने हजार-पाचशेच्या नोटांमध्ये फक्त पाच हजार रूपये जमा करण्याची मुभा दिलीय. त्यापेक्षा जास्त रक्कम हजार-पाचशेंच्या नोटांमध्ये तुमच्याकडे असेल तर तीही भरता येईल मात्र नोटाबंदी जाहीर झाल्यापासून आजवर ही रक्कम का भरली नाही, याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.

एवढंच नाही तर अशा उशीराने हजार-पाचशेच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी आलेल्या ग्राहकाने दिलेलं स्पष्टीकरण बँकेच्या दोन अधिकाऱ्यांसमक्ष नोंदवावं लागणार आहे. त्याची व्यवस्थित नोंद ठेवावी लागणार आहे. शिवाय त्याचं अकाऊंट केवायसी परिपूर्ण असलं पाहिजे या अटीही आहेत.

एका बाजूला 30 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा बँकेत भरण्याची मुभा आहे, आत्ताच बँकेत पैसे भरण्यासाठी गर्दी करून बँकेवरील ताण वाढवू नका, असं आधीच सरकारकडून सांगण्यात आलं होतं. आता मात्र सरकारने कोणतंही स्पष्टीकरण न देता शेवटच्या दहा दिवसात जमा करावयाच्या हजार-पाचशेच्या नोटांवर अंशतः निर्बंध आणले आहेत.

त्याचवेळी सरकारकडून हे ही स्पष्ट करण्यात आलंय की अलीकडेच जाहीर केलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत खातेदार कितीही पैसे भरू शकतात. त्यांच्यासाठी ही पाच हजार रूपयांची मर्यादा नाही. म्हणजेच काळा पैसा उजेडात आणण्याच्या अनेक योजना जाहीर करूनही त्याचा फारसा उपयोग न झाल्याने आता नोटाबंदीच्या शेवटच्या टप्प्यात पाच हजार पेक्षा जास्त रद्द झालेल्या नोटा जमा करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. कारण पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत पैसे भरण्यावर कसलेही निर्बंध नाहीत तर ते आहेत पाच हजार रूपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेत जमा करण्यावर.

रिझर्व बँकेने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवायचा तर बँकिंग सिस्टीममध्ये आणखी पाच लाख कोटी रूपयांची प्रतिक्षा आहे. ही रक्कम बँकेकडे जमा होण्यासाठी तसा फक्त 11 दिवसांचा कालावधी उरलाय. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा कालावधी विचारात घेतला तर त्यात आणखी तीन महिने जोडावे लागतील. म्हणजे जवळपास सव्वातीन महिन्यात पाच लाख कोटी रूपये बँकिंग सिस्टीममध्ये परत यावे लागतील.

रिझर्व बँक रद्द झालेल्या नोटांच्या वापरासंबंधी तसंच त्या बँकेत जमा करण्याविषयी सातत्याने नव्या सुचना आणि आदेश जारी करत आहे, ते पाहता पंतप्रधान गरीब कल्याण योजनेलाही किती मुदतवाढी किंवा त्यात काय काय बदल होतील.. हे आत्ताच सांगता येणार नाही.

संबंधित बातमी


RTI: नोटाबंदी दिवशी RBI ची स्थिती काय होती?