मुंबई : गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत भारतातील घरघुती कर्जाचे प्रमाण वाढून ते जीडीपीच्या 37.1 टक्क्यांवर पोहचलं तर कुटुंबाच्या बचतीच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली असून ती 10.4 इतक्या खालच्या पातळीवर पोहचली आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाला असून याला जवळपास वर्षभर लावण्यात आलेला लॉकडाऊन कारणीभूत असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या अहवालात सांगितलं आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षी मार्चमध्ये लावण्यात आलेल्या लॉकडाऊनला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या काळात कोट्यवधी लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यामुळे लोकांना आपल्या बचतींना हात घालावा लागला. या काळात लोकांकडे उत्पन्नाचं कोणतंही साधन नसल्याने त्यांनी बँकातून आपल्या बचती काढायला सुरुवात केल्या. याचा परिणाम असा झाला की या काळात अर्थव्यवस्थेतील एकूण क्रेडिटपैकी 51.5 क्रेडिट हे केवळ कुटुंबातील बचतींचे होते, हा पैसा मार्केटमध्ये आला.
पण या वर्षीच्या सुरुवातीला पहिल्या तिमाहीत या आकडेवारीत बदल झाला असून कुटुंबातील बचतीचे प्रमाण जीडीपीच्या तुलनेत 10.4 टक्क्यांवरुन ते आता 21 टक्क्यांवर पोहचलं आहे. लॉकडाऊन संपला आणि लोकांचे कामधंदे सुरु झाल्याने लोकांनी पुन्हा एकदा बचती करायला सुरुवात केल्याचं दिसून आलंय.
साधारणपणे अर्थव्यवस्था संकुचित होत असते किंवा त्याचे प्रमाण कमी होत असतं त्यावेळी कुटुंबांचा बचत करण्याकडे कल असतो. पण जेव्हा अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर येते किंवा ती वाढीच्या टप्प्यावर असते त्यावेळी लोकांचा खर्च करण्याकडे कल असतो. कारण या काळात लोकांच्या मनात अर्थव्यवस्थेबद्दल विश्वास निर्माण होतो असं आरबीआयच्या एका तज्ज्ञांनी स्पष्ट केलं.
2008-09 साली जागतिक मंदी आली होती त्यावेळी असाच ट्रेन्ड आल्याचं पहायला मिळालं होतं. त्यावेळीही लोकांना आपल्या बचती काढून त्या मोठ्या प्रमाणावर खर्च कराव्या लागल्या होत्या. आरबीआयच्या या अहवालात असंही सांगण्यात आलंय की तिसऱ्या तिमाहीत ही आकडेवारी अजून खाली जाण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
- दोन हजारच्या नोटांची मागील दोन वर्षांपासून छपाई बंद
- Petrol and Diesel price| इंधनाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम सर्वच क्षेत्रावर: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास