तंजावूर : अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या कमल हसन यांच्या राजकीय कारकिर्दीकडे कलाविश्वासोबतच राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागलेलं आहे. कमल हसन यांचा पक्ष मक्कल निधी मय्यम तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. निवडणुकांचं वातावरण पेटलेलं असतानाच सोमवारी तंजावूर येथे असं काही घडलं की याची बरीच चर्चा झाली.
तंजावूर जिल्ह्यामध्ये प्रचारसभेसाठी जाण्यास निघालेलं असतानाच EC फ्लाईंग स्क्वाड कमल हसन यांच्या वाहनात पोहोचलं आणि त्यांनी वाहनाची तपासणी केली. सूत्रांच्या माहितीनुसार हसन त्रिचीच्या दिशेनं एका प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी निघाले होते.
जनसंपर्कात कमल हसन व्यग्र
मक्कल निधी मय्यम या पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या कमल हसन यांनी मागील बऱ्याच काळापासून जनसंपर्काला प्राधान्य दिलं आहे. ते स्वत: कोईंबतूर दक्षिण येथून विधानसभा निवडणूक मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पक्षानं जाहीरनामाही प्रसिद्ध केला आहे. यामध्ये गृहिणींच्या मानधनाबाबतचा मुद्दा चांगलाच प्रकाशझोतात आला आहे.
मागील निवडणुकांची आकडेवारी काय सांगते?
मागील निवडणुकीमध्ये जयललिता यांच्या नेतृत्त्वात सलग दुसऱ्यांचा एआयडीएमकेनं बाजी मारली होती. या निवडणुकीचा निकाल ऐतिहासिक होता, कारण 1984 नंतर पहिल्यांदाच असं घडलं होतं की, राज्यात दुसऱ्यांदा कोणा एका पक्षानं सत्ता स्थापित केली होती. 2016 मधील विधानसभा निवडणुकांमध्ये एआयडीएमकेनं 135 जागांवर विजय मिळवला होता. तर, काँग्रेस आणि डीएमकेनं युती करत निवडणूक लढवली होती. डीएमकेला 88 आणि काँग्रेसला इथं 8 जागा मिळाल्या होत्या. अभिनेता विजयकांत यांच्या पक्षानं 104 जागांवर निवडणूक लढवली होती. पण, एकागी जागेवर त्यांना यश मिळवता आलं नव्हतं. खुद्द विजयकांतसुद्धा निवडणूकीत पराभूत झाले होते.